शिवम् असोसिएट्स’चा मालक शिवानंद निलण्णावर याची ४२७ कोटींची संपत्ती जप्त
राजू कुंभार: खानापूर
शिवम् असोसिएट्स’चा मालक शिवानंद निलण्णावरयाच्या विरोधातील आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अत्यंत धडक कारवाई केली आहे. ईडीने या प्रकरणातीतल तब्बल ४२७ कोटी रुपयांच्या संपत्तीवर जप्ती आणली आहे. शिवम् असोसिएट्सच्या माध्यमातून तब्बल २,४५९ कोटी रुपयांची प्रचंड फसवणूक झाल्याचे ईडीच्या तपासात उघडकीस आले आहे. जिल्ह्यासह खानापूर तालुक्यातील अनेक शिक्षकांनी देखील बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात शिवम् असोसिएट मध्ये लाखोची गुंतवणूक केली असल्याची चर्चा होती. त्यामुळे त्यांच्याही गुंतवणकीवर पाणी फिरल्याने त्यांची झोप उडाली आहे.
कोणकोणती संपत्ती जप्त केली?
ईडीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईमध्ये विविध प्रकारच्या मालमत्तांचा समावेश आहे, ज्यामध्ये:
- ३६७ कोटी रुपये मूल्याच्या मुदत ठेवी (Fixed Deposits)
- ४७ वेगवेगळ्या बँक खात्यांमधील ४४ कोटी रुपयांची रोकड
- १३ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता (जमीन व बंगले)
- १.३१ कोटी रुपयांची शेअर बाजारामधील गुंतवणूक
कशी उघडकीस आली फसवणूक?
बेळगावमधील माळमारुती पोलीस ठाण्यात याप्रकरणी प्राथमिक गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील काळ्या पैशांच्या व्यवहाराचा (Money Laundering) तपास हाती घेतल्यानंतर ईडीने २०२६ मध्ये बेळगाव आणि चिक्कोडीसह ८ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले होते. या कारवाईदरम्यान महत्त्वाची कागदपत्रे, हस्तलिखिते आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले होते.
तपासादरम्यान असे समोर आले की, शिवानंद निलण्णावरयाने ३५,००० हून अधिक गुंतवणूकदारांना अमिष दाखवून तब्बल २,४५९ कोटी रुपयांची रक्कम गोळा केली होती. या प्रकरणी ८ ऑगस्ट २०२६ रोजी मुख्य सूत्रधार शिवानंद याला अटक करण्यात आली. त्यानंतर ९ ऑक्टोबर रोजी त्याच्यासह इतर पाच जणांवर मंगळुरू येथील विशेष न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल करण्यात आले आहे.
शेअर बाजार आणि चित्रपट निर्मितीत पैशांची उधळपट्टी
ईडीच्या तपासात अत्यंत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. गुंतवणूकदारांकडून गोळा केलेले हे महाप्रचंड कोट्यवधी रुपये शेअर मार्केटमध्ये उच्च जोखमीच्या ठिकाणी गुंतवण्यात आले होते, ज्यामुळे तब्बल १८५.९५ कोटी रुपयांचे नुकसान झाले. याशिवाय, सुमारे २५ कोटी रुपयांची रक्कम सहकारी क्रेडिट सोसायटींच्या माध्यमातून इकडे-तिकडे वळवली गेली.
फसवणुकीच्या या पैशांमधून मुदत ठेवी तयार करून त्याआधारे स्वतःच्या नातेवाईक व सहकाऱ्यांच्या नावावर कर्जे काढून जमीन खरेदी करण्यात आली. तसेच, आरोपीने ही रक्कम पत्नी संगीता आणि अल्पवयीन मुलगा सिद्धांत यांच्या बँक खात्यांमध्ये तसेच इतर व्यावसायिक कंपन्यांकडे वळवली होती. एवढेच नव्हे तर, लोकांच्या घामाच्या पैशांमधून तब्बल ५ कोटी रुपये ‘चॅम्पियन’ नावाच्या एका कन्नड चित्रपटाच्या व्यावसायिक निर्मितीसाठी देखील वळवण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
Advertise



