२२ वर्षीय तरुणाचा मृतदेह पानबुडीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात यश; यमकरमर्डी पोलीस ठाण्यात नोंद.
प्रतिनिधी : श्री स्वप्निल कुंभार.
हुक्केरी (कर्नाटक) तालुक्यातील शिरूर येथील मार्कंडेय धरण परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या एका २२ वर्षीय तरुणाचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कागणी (ता-चंदगड) येथील मूळ निवासी असलेला आणि सध्या बेळगावमधील शिवाजीनगर येथे राहणारा आशिष अशोक राजगोळकर (वय २२) असे मृत तरुणाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, आशिष हा बेळगावमधील एका हेल्मेट कंपनीत कर्मचारी म्हणून कार्यरत होता. रविवारी (दि. २५) सायंकाळी तो आपल्या बारा मित्रांच्या समवेत फिरण्यासाठी व आनंद घेण्यासाठी शिरूर येथील मार्कंडेय धरण परिसरात गेला होता. यादरम्यान धरणामध्ये पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने किंवा खोली जास्त असल्यामुळे आशिषचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच शोधकार्य सुरू करण्यात आले. सोमवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास पासबुडीच्या (पाणबुडीच्या) साहाय्याने अथक प्रयत्नांनंतर आशिषचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले. या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे कागल आणि बेळगाव परिसरातील नागरिकांकडून व मित्रांकडून तीव्र शोक व्यक्त होत आहे. मृत आशिषच्या मागे आई-वडील, भाऊ, आजी आणि आजोबा असा परिवार आहे. याप्रकरणी यमकरमर्डी (ता. हुक्केरी) पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

