अंकले येथील भूतनाथ देवस्थानासाठी ५ लाखांचा निधी


अंकले येथील भूतनाथ देवस्थानासाठी ५ लाखांचा निधी

आमदार चन्नराज हट्टीहोळी यांची ग्वाही

इरफान तालीकोटी यांच्या प्रयत्नांना यश; यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांतून समाधान

राजू कुंभार | खानापूर 

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या अंकले येथील श्री भूतनाथ आणि श्री ब्रह्मलिंग यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील विकासकामे वेगाने सुरू आहेत. नुकतीच काँग्रेस नेते इरफान तालीकोटी यांनी देवस्थान परिसराला भेट देऊन कामांची पाहणी केली.

या भेटीदरम्यान मंदिर ट्रस्ट कमिटीने देवस्थानची कमान उभारणे आणि इतर प्रलंबित विकासकामांसाठी निधीची गरज असल्याचे तालीकोटी यांच्या निदर्शनास आणून दिले. ग्रामस्थांची ही मागणी लक्षात घेऊन इरफान तालीकोटी यांनी ट्रस्ट कमिटीच्या सदस्यांसह आमदार चन्नराज हट्टीहोळी यांची भेट घेतली. आमदार हट्टीहोळी यांनी कामाचे संपूर्ण अंदाजपत्रक (Estimate) तपासून येत्या दोन दिवसांत ५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्याची ग्वाही दिली.

विद्युत पुरवठ्यासाठी KEB कडे विशेष मागणी

सध्या देवस्थानाला गणेबैल गावच्या वेशीतील जंगल-झाडीतून विद्युत पुरवठा केला जातो. त्यामुळे अनेकदा झाडे पडल्यास कित्येक दिवस वीज खंडित राहते. ही समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय महामार्गापासून (Highway) देवस्थानापर्यंत रस्त्याच्या कडेने नवीन विद्युत खांब उभारावेत, तसेच भाविकांच्या रात्रीच्या सुरक्षेसाठी प्रत्येक खांबावर हायमास्ट लाईट लावावेत, अशी आग्रही मागणी तालीकोटी यांनी ‘केइबी’ (KEB) प्रशासनाकडे केली आहे.

ग्रामस्थ व ट्रस्ट कमिटीची उपस्थिती

या प्रसंगी श्री भूतनाथ व ब्रह्मलिंग ट्रस्ट कमिटीचे प्रमुख आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये श्री. मारुती नानू निडगलकर, श्री. मल्हारी नारायण सावंत, श्री. यल्लापा लक्ष्मण होसुरकर, श्री. नागेंद्र ईश्वर होसुरकर, श्री. गणपती गुंडू कुलम, श्री. नामदेव ईश्वर चोपडे, श्री. सदोबा रामू गोरल, श्री. बुधाप्पा विठोबा मोटर, श्री. जोतिबा निंगाप्पा गुरव, श्री. संतोष तुकाराम सावंत, श्री. सातेरी मारुती चोपडे आणि श्री. भैरू रवळू गावाडे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

निधी मंजूर झाल्यामुळे आणि रस्त्यावरील दिव्यांचा प्रश्न सुटणार असल्याने अंकले ग्रामस्थांमधून आणि भाविकांमधून  समाधान व्यक्त केले जात आहे.

Advertise


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!