
देशसेवेसोबतच क्रीडासेवेचा ध्यास! BSF जवान नागेश पाटीलचे कौतुक
‘पाटील फौजी ट्रॉफी २०२६’ पर्व 2 चा शानदार शुभारंभ
विशेष वृत्त / राजू कुंभार
सीमेवर देशाचे रक्षण करतानाच आपल्या गावातील क्रीडापटूंना वाव मिळावा आणि गावातील उदयोन्मुख खेळाडूंच्या गुणवत्तेला धार मिळावी, या ध्येयाने प्रेरित होऊन भारतीय सीमा सुरक्षा दलातील (BSF) जवान नागेश शिमाणी पाटील यांनी एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. नागुर्डा गावातील युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी स्वखर्चाने आयोजित केलेल्या ‘पाटील फौजी ट्रॉफी २०२६’ या भव्य क्रिकेट स्पर्धेचा गुरुवारी रात्री अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात शुभारंभ झाला.
गेल्या दोन वर्षांपासून जवान नागेश पाटील हे स्वतःच्या खर्चाने या नागुर्डा येथे स्पर्धेचे यशस्वी आयोजन करत असून, त्यांच्या या क्रीडाप्रेमी उपक्रमाला गावकऱ्यांनीही मोलाचे पाठबळ दिले आहे.
चषक अनावरण आणि मैदान पूजन
स्पर्धेचे उद्घाटन नागेश पाटील यांचे वडील शिमानी पाटील आणि विजय दत्तू चापगावकर यांच्या शुभहस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक मारुती सातेरी धारवाडकर उपस्थित होते.
ट्रॉफी अनावरण: उपस्थितांच्या आणि मान्यवरांच्या हस्ते ‘पाटील फौजी ट्रॉफी २०२६’च्या आकर्षक चषकांचे अनावरण करण्यात आले. मैदान पूजन: क्रिकेट मैदानाचे पूजन विजय चापगावकर यांच्या हस्ते पार पडले.
“देशसेवेसोबत सामाजिक बांधिलकीचा आदर्श!”
याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना जयराज चापगावकर म्हणाले, “नागेश पाटील हे सीमेवर देशाचे रक्षण करत असतानाच गावातील प्रत्येक सामाजिक आणि क्रीडा उपक्रमात नेहमी हिरीरीने पुढाकार घेतात. देशसेवेच्या कर्तव्यासह आपल्या मातीशी असलेली सामाजिक बांधिलकी त्यांनी जपली आहे. सलग दुसऱ्या वर्षी त्यांनी ‘पाटील फौजी ट्रॉफी’चे उत्कृष्ट आयोजन केले असून, त्यांच्या या पुढाकारामुळे गावातील युवक-युवतींना नक्कीच मोठे प्रोत्साहन मिळेल.”
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
या शानदार उद्घाटन प्रसंगी गावातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवला. यामध्ये गंगाराम चापगावकर, उदय महाजन, म्हात्रू चापगावकर, दूर्गाप्पा महाजन, रामू महाजन, नामदेव पाटील, हणमंत महाजन, परशराम रा. महाजन, प्रकाश चापगावकर, दीपक कांबळे, बाळू कांबळे, गणपती नांदुरकर, आकाश चापगावकर, परशराम स. महाजन आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन विठ्ठल खननुकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार राजू ठोंबरे यांनी मानले. या स्पर्धेमुळे गावातील क्रीडाप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.
Advertise


