तोराळी बंधाऱ्याला पडली भोके!पाणी गेले वाहून


तोराळी बंधाऱ्याला पडली भोके!पाणी गेले वाहून; ग्रामस्थ आक्रमक, आंदोलनाचा इशारा!

राजू कुंभार: खानापूर

यंदाच्या कमी पावसामुळे आधीच दुष्काळाचे सावट पसरलेले असताना, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एक भयंकर प्रकार समोर आला आहे. तोराळी येथील मलप्रभा नदीवरील बंधाऱ्याच्या दरवाजांना मोठी भोके पडल्याने साठवलेले लाखो लिटर पाणी वाया जात आहे. प्रशासनाच्या या बेजबाबदार कारभारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त केला असून परिसरातील पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे.

 

सरकारी सोपस्कार आणि गंजलेले दरवाजे!

मिळालेल्या माहितीनुसार, आठवड्याभरापूर्वीच लघु पाटबंधारे विभागाने पाणी अडवण्यासाठी बंधाऱ्याचे लोखंडी दरवाजे खाली केले होते. मात्र, विभागाने केवळ ‘सरकारी सोपस्कार पूर्ण केल्याचे स्पष्ट दिसत आहे. बंधाऱ्याचे दरवाजे संपूर्णपणे गंजून आणि सडून गेले आहेत. दरवर्षी दरवाजे बसवताना रबर लावून ते पाणी गळती रोखण्यासाठी घट्ट केले जातात, मात्र यंदा प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.गंजलेल्या दरवाजांच्या भोकातून साठवलेले पाणी प्रचंड वेगाने वाहून जात आहे.

पिण्याच्या पाण्यासह जनावरांचे हाल होणार!

यंदा पावसाअभावी परिसरातील नदी-नाले आधीच कोरडे पडले आहेत. अशा बिकट परिस्थितीत बंधाऱ्यात अडवलेले पाणीही वाहून गेल्यामुळे येत्या काही दिवसांत पिण्याच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

या पाण्याचा फटका फक्त गावकऱ्यांनाच नाही, तर गुरे ढोरे आणि वन्यप्राण्यांनाही बसणार असून त्यांच्यासमोर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.

प्रशासनाविरुद्ध ग्रामस्थ संतापले; आंदोलनाचा इशारा!

“प्रशासनाने पाणी अडवण्याकडे अजिबात गांभीर्याने पाहिलेले नाही. भीषण दुष्काळाच्या छायेत असताना असा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन गळती थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू!”

व्यंकट शंकर पाटील (ग्रामस्थ)

Advertise …


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!