आमदार शिवाजीराव पाटील व पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांची उपस्थिती; भाविकांची अलोट गर्दी.
चंदगड प्रतिनिधी : श्री स्वप्निल कुंभार.
८४ खेड्यांचे आराध्य दैवत म्हणून चंदगड पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या श्री देव रवळनाथ मंदिरात सालाबादप्रमाणे नवमीची दसरा आरती मंगळवारी भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. यावेळी मंदिर परिसरात भाविक व भक्तांची मोठी गर्दी झाली होती.

चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील तसेच चंदगडचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे व चंदगड चें नगराध्यक्ष सुनील काणेकर यांच्या उपस्थितीत दुपारी ठीक साडेतीन वाजता आरतीचा सोहळा पार पडला. मंदिराचे पुजारी विलास मनोहर गुरव यांनी परंपरेनुसार डोक्यावर आरती घेण्याचा मान स्वीकारला. त्यांनी मंदिर तसेच परिसरातील इतर देवी-देवतांच्या मंदिरांमध्ये दिवा-वाती व गाऱ्हाणे घालून प्रदक्षिणा पूर्ण केली.

यावेळी चंदगड ग्रामस्थांच्या वतीने मंदिर परिसरात सासनकाठी खेळविण्यात आली. आरती सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या भाविकांनी श्री देव रवळनाथाच्या चरणी आपल्या मनोकामना व्यक्त करून आशीर्वाद घेतला. पारंपरिक धार्मिक विधी, सासनकाठी आणि भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला होता.

या धार्मिक सोहळ्याचे नियोजन व आयोजन यशस्वी करण्यासाठी श्री देव रवळनाथ ट्रस्टचे सेक्रेटरी सुरेश सातवणेकर तसेच देव रवळनाथाचे मानकरी यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनामुळे आणि सहकार्यामुळे दसरा नवमीचा आरती सोहळा शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
परंपरा, श्रद्धा आणि भक्तिभाव यांचा सुरेख संगम साधत श्री देव रवळनाथाची नवमीची दसरा आरती उत्साहात व भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

