वारणा बँकेच्या वसुली अधिकाऱ्याची चंदगड पोलिसांत फिर्याद.
चंदगड (प्रतिनिधी): श्री स्वप्निल कुंभार.
चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग येथील ‘शिवांक कॅश्यु प्रोसेसिंग युनिट’ या बँकेच्या ताब्यात असलेल्या मालमत्तेचे सीलबंद कुलूप तोडून आत प्रवेश करत मालमत्तेचा बेकायदेशीरपणे ताबा घेतल्याप्रकरणी तिघांवर चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस दप्तरी नोंद झालेल्या माहितीनुसार, १) नारायण गोपाळ दळवी, २) नितीन नारायण दळवी आणि ३) यशोदा गोपाळ दळवी (सर्व रा. मांडेदुर्ग, ता. चंदगड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मांडेदुर्ग गावच्या हद्दीत असलेल्या ‘शिवांक कॅश्यु प्रोसेसिंग युनिट’च्या मशिनरी, शेड व इमारतीचा ताबा वारणा बँकेकडे आहे. दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४:५० वाजेच्या सुमारास सुरक्षा रक्षक यमाजी मयाप्पा कांबळे हे ड्युटीवर कार्यरत असताना, संशयित आरोपींनी विनापरवाना बँकेचे सीलबंद कुलूप तोडले. त्यानंतर आत प्रवेश करून बँकेच्या ताब्यातील या मिळकतीचा बेकायदेशीर ताबा मिळवून त्याचा वापर करण्यास सुरुवात केली.
याप्रकरणी वारणा बँक शाखा गडहिंग्लजचे वसुली अधिकारी प्रशांत पांडुरंग कांडगावकर (वय ४२, मूळ रा. माले, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) यांनी चंदगड पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष हजर राहून फिर्याद दिली आहे.
फिर्यादीवरून चंदगड पोलिसांत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२९(३), ३(५) अन्वये गुन्हा नोंद (गु.र.नं. ३४५/२०२६) करण्यात आला आहे. सदर गुन्हा म.पो.हे.कॉ. २०७९ चौगुले यांनी दाखल केला असून, पोलीस निरीक्षकांच्या आदेशाने पोलीस नाईक ५६९ देसाई पुढील तपास करत आहेत.

