चंडीहोम यज्ञ, कुमारिका पूजन अन् दुष्काळमुक्तीच्या साकड्याने नवरात्रोत्सवात रंगला उत्साहाचा सोहळा.
चंदगड प्रतिनिधी: श्री स्वप्निल कुंभार.

नवरात्रोत्सवाच्या पवित्र पर्वावर चंदगड येथील ‘आकर्षक क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, कुंभार गल्ली’ च्या ३१ व्या वर्षानिमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांना पंचक्रोशीतील भाविकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. यानिमित्त आयोजित महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी चंदगड तालुक्यातील विविध गावांमधून तब्बल ३,८०० ते ४,००० हून अधिक दुर्गाभक्तांनी अलोट गर्दी करत आई महालक्ष्मीच्या चरणी लीन होत प्रसादाचा आस्वाद घेतला.
वैदिक विधी आणि चंडीहोम यज्ञाने मंगलमय वातावरण:
उत्सवाच्या पूर्वार्धात म्हणजेच गुरुवारी (दि. १५) मंडळाच्या वतीने गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, देवी पीठ स्थापन, ग्रहमुख आणि कुंकुमार्चन यांसारख्या धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते.

दुसऱ्या दिवशी आज (शुक्रवार, दि. १६) सकाळी मुख्य आकर्षण असलेल्या चंडीहोम यज्ञाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या यज्ञाचे मानकरी म्हणून मंडळातील संस्थापक ज्येष्ठ सदस्यांना आपल्या अर्धांगिनीसह बसण्याची संधी मिळाली. यज्ञाची पूर्णाहुती झाल्यानंतर कुष्मांडाबली विधी पार पडला आणि त्यानंतर लहान कुमारिकांचे पूजन करून कन्यारत्न व मातृशक्तीचा गौरव करण्यात आला.
आईच्या चरणी दुष्काळमुक्तीचे साकडे:
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात गारानी (साकडे) घालून उपस्थितांनी आई महालक्ष्मीकडे अत्यंत भावनिक प्रार्थना केली. सध्या जाणवत असलेल्या दुष्काळाचे संकट आईच्या आशीर्वादाने दूर होवो, राज्यातील सर्व नागरिकांना व भाविकांना उत्तम आरोग्य आणि सुखी आयुष्य लाभो, अशी आर्त हाक आईच्या दरबारात घालण्यात आली. यानंतर महाआरती पार पडली व महाप्रसाद भक्तांसाठी खुला करण्यात आला.

भक्तांच्या गर्दीने उंचावला मंडळाचा उत्साह:
चंदगड पंचक्रोशीतून आलेल्या भाविकांनी कुंभार गल्लीच्या श्री महालक्ष्मीसमोर आपल्या मनातील इच्छा, आकांक्षा आणि दुःख व्यक्त करून आशीर्वाद घेतले. मंडळाच्या सर्व तरुण कार्यकर्त्यांनी व चंदगड नगरीतील विविध मंडळांच्या महालक्ष्मी भक्तांनी अहोरात्र मेहनत घेऊन हा महाप्रसादाचा कार्यक्रम यशस्वी केला आणि आई दुर्गेची मनोभावे सेवा केली. या भव्य आयोजनामुळे संपूर्ण चंदगड परिसर देवीमय आणि भक्तीमय होऊन गेला होता.


