पंडित ओगलेंनी जांबोटी जिल्हा पंचायत लढवावी!


पंडित ओगलेंनी जांबोटी जिल्हा पंचायत लढवावी!

कार्यकर्त्यांची जोरदार मागणी; भाजपच्या गोटात प्रचंड खळबळ, आमदार विठ्ठल हलगेकरांसमोर धर्मसंकट?

राजू कुंभार: खानापूर 

जांबोटी जिल्हा पंचायत मतदार संघातून श्रीराम सेनेचे तालुकाध्यक्ष आणि प्रखर हिंदुत्ववादी भाजप युवा नेते पंडित ओगले यांनी निवडणूक लढवून प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश करावा, अशी तुफान मागणी जांबोटी भागातील हिंदुत्ववादी व भाजप कार्यकर्त्यांमधून जोर धरू लागली आहे. पंडित ओगले स्वतः या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे संकेत मिळत असल्याने भाजपच्या स्थानिक गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घडामोडींमुळे आमदार विठ्ठल हलगेकर आणि तालुकाध्यक्ष बसवराज सानिकोप यांच्यासमोर मोठा राजकीय पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हिंदुत्वाचा आक्रमक चेहरा अन् त्यागाची पार्श्वभूमी

वयाच्या विसाव्या वर्षापासून हिंदुत्ववादी कार्यात सक्रिय असलेल्या पंडित ओगले यांनी सुरुवातीला प्रमोद मुतालिक यांच्या श्रीराम सेनेच्या माध्यमातून कार्य सुरू केले. पुढे त्यांनी श्रीराम सेनेचे तालुकाध्यक्ष म्हणून धुरा सांभाळली. गेल्या १० वर्षांच्या काळात त्यांनी तालुक्यातील गाव-खेड्यांतून शेकडो युवक-युवतींना हिंदुत्वाच्या प्रवाहात आणले, ज्यामुळे भाजप पक्षासाठी मोठी पोषक पार्श्वभूमी तयार झाली.

हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरून लढा देताना ओगले यांना अनेकदा तुरुंगात जावे लागले, अनेक पोलिस केसेस अंगावर घ्याव्या लागल्या; मात्र डगमगून न जाता त्यांनी आपले समाजकार्य अविरतपणे सुरू ठेवले.

ज्येष्ठांचा मान राखला, आता स्वतः मैदानात उतरण्याची वेळ!

नव्या काळात ग्रामीण भागात भाजपची विचारधारा पोहोचवण्यात पंडित ओगले यांचा वाटा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) किंवा वरिष्ठ नेत्यांच्या संबंधांचा वापर करून त्यांना सहज राजकीय तिकीट मिळवता आले असते; मात्र त्यांनी नेहमीच पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा मान राखत स्वतःला मागे ठेवले.मात्र आता वेळ आली असून, पंडित ओगले यांनी जांबोटी जिल्हा पंचायतीच्या माध्यमातून आपल्या राजकीय वाटचालीचा ‘श्रीगणेशा’ करावा, असा पक्का निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे.

पक्षाचे वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या मागणीचा विचार करणार का?

जांबोटी भागात पंडित ओगले यांना मानणारा शेकडो कार्यकर्त्यांचा ताफा आहे. त्यांचे आक्रमक वक्तृत्व आणि लोकांच्या अडीअडचणीला धावून जाण्याची वृत्ती या बळावर ते या मतदारसंघातून मोठा विजय मिळवू शकतात, असा ठाम विश्वास समर्थकांना आहे.

आता या सर्व पार्श्वभूमीवर भाजप पक्षश्रेष्ठी आणि स्थानिक नेतृत्व कार्यकर्त्यांच्या या भावनेचा आणि मागणीचा विचार करून पंडित ओगले यांना संधी देणार का? की पक्षात नवीन राजकीय नाट्याला सुरुवात होणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Advertise


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!