दुष्काळ जाहीर करून काय साधणार? मलप्रभेचे पाणी पळवून वाळवंट करण्याचा डाव!


दुष्काळ जाहीर करून काय साधणार? मलप्रभेचे पाणी पळवून वाळवंट करण्याचा डाव!

ॲड. नंद्रनकर यांचा प्रशासनासह लोकप्रतिनिधींवर घणाघात

खानापूर: राजू कुंभार 

तालुक्याला शासनाने दुष्काळग्रस्त घोषित केले असले तरी या निर्णयाने तालुक्यातील पाणी आणि दुष्काळाचा मूळ प्रश्न सुटणार नाही, आपल्या जन्मजात हक्काचे मलप्रभा नदीचे पाणी इतर तालुके आणि जिल्ह्यांना पळवले जात असताना, केवळ तालुका ‘दुष्काळग्रस्त’ जाहीर करण्याचे नाटक कशासाठी? असा सवाल ॲडव्होकेट सोनाप्पा नंद्रनकर (कांजळे) यांनी उपस्थित करत त्यांनी प्रशासन आणि आजी-माजी लोकप्रतिनिधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.”मलप्रभेचे पाणी पळवून तालुक्याला वाळवंट बनवण्याचे षडयंत्र” आहे असा आरोप त्यांनी केला.

ॲड. नंद्रनकर यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे आणि उपस्थित केलेले ज्वलंत प्रश्न (ॲड.नंद्रनकर हे मुंबई उच्च न्यायालयात वकिली करत आहेत.)

पाणी पळवले, आता दुष्काळाचे नाटक: ज्या मलप्रभा नदीच्या पाण्यावर तालुक्यातील पिढ्यानपिढ्यांचे जीवन, जनावरे, पिके आणि गावे जगली आहेत, तेच पाणी प्रशासनाच्या डोळ्यांसमोरून (किंवा त्यांच्या मदतीने) पळवण्यात आले. आता मात्र तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून जनतेच्या डोळ्यात धूळ फेकली जात आहे.

भविष्यातील भीषण संकट: येणाऱ्या काळात मलप्रभेवर अवलंबून असणारी खेडी आणि संपूर्ण खानापूर शहर पिण्याचे पाणी कोठून आणणार? इथली पाळीव जनावरे कुठे जाणार आणि शेतकरी आपली पिके कशी जगवणार? असा सवाल त्यांनी केला.

रेव्हेन्यू अधिकारी आणि दलालांची तुंबडी भरण्याचा घाट? तालुक्याला वाळवंट बनवणाऱ्यांचे डोके ठिकाणावर आहे का? की दुष्काळग्रस्त घोषित करून कवडीमोलाची मदत जाहीर करायची आणि त्यातील मोठा वाटा तहसील कार्यालयातील अधिकारी व त्यांच्या दलालांच्या घशात घालायचा? शेतकरी आणि सामान्य जनता मात्र पाण्यासाठी तडफडत राहील,

दरवर्षी दुष्काळग्रस्तच ठेवणार का? मलप्रभेवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी केवळ ‘दुष्काळग्रस्त’ म्हणून घोषित करून मूळ समस्येकडे दुर्लक्ष केले जाणार का, असा सवाल त्यांनी विचारला.

कूसमळी पाणी प्रकल्प आणि बेळगाव ग्रामीणचे राजकारण

कूसमळी पाणी प्रकल्पाच्या नावाखाली मोठा थाटमाट करत बेळगावच्या ग्रामीण भागाला पाणी देण्याचे राजकारण खेळले जात आहे. या राजकारणात लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला स्थानिक जनतेचा पुरता विसर पडला आहे.

जांबोटी परिसरातील आसपासच्या खेड्यांना तात्काळ स्वतंत्र पाणीपुरवठा प्रकल्प उभारून येथील जनतेचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्वरित सोडवला पाहिजे.

 


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!