लोंढा जि. पं.च्या आरक्षणावर रामचंद्र मादार यांचा आक्षेप


लोंढा जि. पं.च्या आरक्षणावर रामचंद्र मादार यांचा आक्षेप

उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा

खानापूर: राजू कुंभार 

तालुक्यातील लोंढा जिल्हा पंचायत मतदारसंघाच्या २०२६ च्या आरक्षण वाटपात चक्रीय पद्धतीचा (Roster System) फज्जा उडाला असून घोर अन्याय झाला आहे, असा आरोप करत या निर्णयाचे पुनर्विलोकन करण्यात यावे, यासाठी गुंजी येथील रहिवासी रामचंद्र मनोहर मादार यांनी राज्य निवडणूक आयोग, बेळगावचे जिल्हाधिकारी, पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे तक्रार व विनंती अर्ज दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोंढा मतदारसंघात २०१२ मध्ये ‘सर्वसाधारण’, २०१६ मध्ये ‘सर्वसाधारण महिला’ आणि आता २०२६ च्या आरक्षणातही पुन्हा ‘सर्वसाधारण महिला’ असेच आरक्षण ठेवण्यात आले आहे. वारंवार एकच आरक्षण येत असल्याने अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील पात्र उमेदवारांना निवडणूक लढवण्याच्या कायदेशीर संधीपासून वंचित ठेवले जात असल्याचा ठपका तक्रारदारांनी ठेवला आहे.

प्रमुख मागण्या:

 कायद्याची पडताळणी: ‘कर्नाटक ग्राम स्वराज्य आणि पंचायत राज कायदा, १९९३’ च्या कलम १६२ व चक्रीय आरक्षण नियमांनुसारच हे आरक्षण निश्चित केले आहे का, याची कसून चौकशी व्हावी.

माहिती सार्वजनिक करावी: २०१२, २०१६ व २०२६ च्या आरक्षणाचा आधार ठरणारी लोकसंख्येची आकडेवारी व अधिकृत दस्तऐवज जनतेसाठी खुले करावेत.

त्रुटी दुरुस्ती व लेखी उत्तर: आरक्षण वाटपात चूक किंवा गैरप्रकार आढळल्यास त्वरित दुरुस्ती करण्यात यावी आणि या अर्जावर प्रशासनाने सकारण लेखी उत्तर द्यावे.

उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा:लोकशाहीत सर्व घटकांना समान व न्याय्य संधी मिळणे आवश्यक आहे. प्रशासनाने या अर्जाची नोंद घेऊन पारदर्शक तपासणी न केल्यास, आम्ही सर्व पुराव्यांनिशी कर्नाटक उच्च न्यायालयात रिट याचिका (Writ Petition) दाखल करून कायदेशीर लढा उभारू,” असा थेट इशारा रामचंद्र मादार यांनी दिला आहे.

Advertise


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!