रात्री केली दारू पार्टी; सकाळी केले मरेपर्यंत वार!


रात्री केली दारू पार्टी; सकाळी केले मरेपर्यंत वार!

मोदेकोपच्या खुन्याने पोलिसांसमोर उघडले तोंड

खानापूर: राजू कुंभार 

मेस्त्रीने रात्री कामगारांसोबत दारू ढोसली. दारूच्या नशेत कामगारांनी मेस्त्रीकडे हिशोब विचारला, रात्री बारा वाजेपर्यंत शाब्दिक चकमक झाली. चिकन मटण वर ताव मारला. सकाळी उठताच मेस्त्रीने कामगाराचा मुडदा पाडला. ही आहे हकीकत नागुर्डा वाड्याच्या गवंड्याच्या खुनाची.

 

घरची बेताची परिस्थिती ठीक करण्यासाठी गवंडी कामाला गेलेल्या मयत महादेव रामू गवसेकर(रा. नागुर्डा वाडा) यांच्या कुटुंबावर मोठे संकट निर्माण झाले आहे.महादेव यांना त्यांच्या कुटुंबीयांनी शेजारील गावातील मेस्त्री असल्याने विश्वासाने खुनी कल्लाप्पा मळवकर यांच्याकडे पाठविले होते. मात्र त्याने विश्वासघात करत रक्तबंबाळ होईपर्यंत सपासप वार करून खून केला.

 

बलिंगा(ता.करवीर) येथील हनुमान गल्लीत वसंत कृष्णा ढेंगे यांच्या घरात कल्लाप्पा मळवकर, महादेव सह तीघेजण गेल्या दोन महिन्यांपासून राहत होते. हे सर्वजण फरशी फिटिंग व बांधकामाची कामे करत होते. २७ सप्टेंबर रोजी मळवकरने एका बांधकामाचे अपूर्ण काम पूर्ण करून मजुरीचे पैसे घेतले होते. याची माहिती कामगारांना होती त्यामुळे हिशोब करण्याचा तगादा कामगारांनी लावला होता.

दरम्यान, २९ सप्टेंबर रोजी दोन मजूर मजुरीचे पैसे घेऊन गावी परतले. त्यामुळे खोलीत कल्लाप्पा मळवकर आणि महादेव गवसेकर हे दोघेच उरले होते. 1 ऑक्टोबर च्या रात्री अन्य एक सहकारी मित्रासह कल्लाप्पा आणि त्यांनी पार्टी केली त्यात दोघांचा वाद रंगला.सकाळी पुन्हा वाद झाला त्यावेळी कल्लाप्पा याने चाकूने वार करून महादेव गवसेकर याला संपविले. दरम्यान, बांधकामाचे काम देणारे उत्तम निगडे यांनी मळवकरला वारंवार फोन केला. मात्र त्याचा मोबाईल नॉट रिचेबल येत होता. अखेर सोमवारी दि.5 ऑक्टोबर रोजी सकाळी ढेंगे यांच्या घरातून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर खोलीत महादेव गवसेकर यांचा मृतदेह आढळून आला. त्यावेळी खुनी मळवकर याचा मोबाईलही बंद असल्याने पोलिसांचा संशय त्याच्यावर बळावला.

 

मोबाईल बंद; पोलिसांनी पंढरपूर गाठले

खून केल्यानंतर संशयिताने घटनास्थळावरून पलायन केले. त्यानंतर तो सांगली, सोलापूर आणि पंढरपूर परिसरात फिरत होता. पैसे संपल्यानंतर पंढरपूर परिसरातच थांबला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला.पोलिसांनी मळवकरच्या पत्नीची चौकशी केली असता त्याचा दुसरा मोबाईल क्रमांक पोलिसांच्या हाती लागला. या क्रमांकाच्या आधारे तपासाची चक्रे फिरली आणि पंढरपूर परिसरातून मळवकरला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आर्थिक कारणातून महादेवचा खून केल्याची कबुली त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास करवीर पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाकडून सुरू आहे.

Advertise


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!