कारलगा, शिवोली व हट्टीकरांना सवलत; पुंडलिक कारलगेकर
खानापूर: राजू कुंभार
कारलगा, शिवोली व हट्टी येथे फेब्रुवारी महिन्यात महालक्ष्मी यात्रेचे आयोजन होणार असल्याने या गावांतील सभासदांना विशेष सहकार्यत येणारा आहे. सभासदांनी संस्थेला भेट द्यावी. असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष माजी जिल्हा पंचायत सदस्य पुंडलीक कारलगेकर यांनी केले आहे.
संस्थेची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकताच संचालक मंडळ व सभासदांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
सभेत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील संघाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी जमा-खर्च पत्रक, कर्ज-जिंदगी, नफा-तोटा पत्रक तसेच विविध आर्थिक अहवाल सभेसमोर सादर करण्यात आले. संघाने आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत १४ लाख ८६ हजार २७६ रुपये ७८ पैसे इतका निव्वळ नफा मिळविल्याची माहिती सभेत देण्यात आली.
सभेदरम्यान सभासदांनी मांडलेल्या विविध तक्रारी, अडचणी व प्रश्नांवर चर्चा करून त्यांचे निराकरण करण्यात आले. सभासदांच्या सहकार्यामुळे संघाची प्रगती होत असून, भविष्यातही सभासदांच्या हिताला प्राधान्य देत संघाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
कारलगा, शिवोली व हट्टी येथे फेब्रुवारी महिन्यात महालक्ष्मी यात्रेचे आयोजन होणार असल्याने या गावांतील सभासदांना विशेष सहकार्य करण्याबाबत सभेत चर्चा झाली. संबंधित सभासदांनी जानेवारी महिन्यात कर्जाची परतफेड केल्यास फेब्रुवारी महिन्यातील कर्जप्रकरणे लवकरात लवकर, शक्यतो आठ दिवसांच्या आत मंजूर करून देण्याबाबत सहकार्य करण्याचे ठरविण्यात आले.
शेतकऱ्यांनी विमा योजनांचा लाभ घ्यावा.
शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध विमा योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. पीक विमा, यशस्विनी विमा तसेच अपघाती विमा यांसारख्या योजनांचा लाभ घेऊन शेतकरी व सभासदांनी स्वतःचे व कुटुंबाचे आर्थिक संरक्षण करावे, असे आवाहन करण्यात आले.
सभासदांच्या लाभांशातून कार्यालयाचा विकास.
मागील वर्षातील सभासदांच्या शेअर लाभांशातून (डिव्हिडंड) संघाच्या कार्यालयाच्या बाजूस कंपाऊंड बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच चालू वर्षातील सभासदांच्या शेअर लाभांशातून कार्यालयात टाइल्स बसविणे आणि जनरेटर खरेदी करणे याबाबतही सभेत निर्णय घेण्यात आला.
याशिवाय संघामध्ये नवीन सभासद नोंदणी, संघाचा आगामी विकास, सभासदांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणे तसेच इतर विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर सभेची सांगता करण्यात आली.
या वार्षिक सर्वसाधारण सभेस संघाचे अध्यक्ष पी. एच. पाटील, पुंडलिक कारलगेकर, विठ्ठल पाटील, गुंडू हलशीकर, संभाजी परिश्वाडकर, पी. के. पाटील, दिलीप पाटील, राहुल पाटील, यल्लप्पा गुरव, संघाचे व्यवस्थापक मुकुंद पाटील, श्रीनाथ पाटील, श्रीहरि पाटील यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य व सभासद उपस्थित होते.
Advertise





