चंदगडमध्ये एमडी ड्रग्ज निर्मिती कारखान्यावर मोठी कारवाई; ५० किलो एमडी ड्रग्स जप्त.


हाजगोळी येथे महाराष्ट्र अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सच्या पुणे पथकाची धडक कारवाई; सुमारे १०० कोटींचे ड्रग्स, साहित्य व रसायने जप्त, दहा जणांना अटक.

उपसंपादक : श्री स्वप्निल कुंभार. (चंदगड, आजरा, गडहिंग्लज)

चंदगड : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील हाजगोळी येथे एमडी ड्रग्ज निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर महाराष्ट्र अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सच्या पुणे पथकाने मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे ५० किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मोठ्या प्रमाणात रसायने व साहित्य जप्त 

कारवाईदरम्यान एमडी ड्रग्ज तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी मोठ्या प्रमाणातील रसायने, साहित्य आणि इतर सामग्री जप्त करण्यात आली असून, त्याची अंदाजे किंमत सुमारे १०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. हाजगोळी परिसरात सुरू असलेल्या या कथित ड्रग्ज निर्मिती कारखान्याचा तपास पथकाकडून करण्यात आला.

चंदगड तालुक्यापासून जवळ असलेल्या गोवा राज्यात या ड्रग्जचा पुरवठा केला जात होता का, यासह या संपूर्ण नेटवर्कबाबत तपास यंत्रणेकडून कसून चौकशी सुरू आहे. कारवाईदरम्यान एकूण दहा जणांना अटक करण्यात आली असून, त्यांची नावे अद्याप सांगण्यात आली नसून त्यांची चौकशी सुरू आहे.

अनेक नावे बाहेर येण्याची शक्यता.

या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, ड्रग्ज निर्मितीचा माल कुठून आणला जात होता आणि त्याचा पुरवठा कुठे केला जात होता, याचा तपास सुरू आहे. या कारवाईमुळे चंदगड परिसरातील अमली पदार्थांच्या संभाव्य नेटवर्कचा पर्दाफाश होण्याची शक्यता असून, तपासातून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे.


101
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!