दोघांना अटक व मुद्देमाल जप्त; चंदगड पोलिसांची कारवाई.
उपसंपादक: श्री स्वप्निल कुंभार. (चंदगड, आजरा, गडहिंग्लज)
चंदगड : चंदगड पोलिसांनी शहरातील मेनरोडवर खेळण्याच्या दुकानाच्या खालिल बाजूला आडोश्याला सुरु असलेल्या मटका जुगारावर कारवाई करून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या कारवाईत रोख रक्कम, जुगाराच्या चिठ्ठ्या, मटका आकड्यांच्या नोंदी असलेली पुस्तके व मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चंदगड मेनरोड वरील प्रणाम खेळण्याच्या दुकानाच्या खालील तळमजल्यावर जिन्याच्या आडोशाला 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे 6.15 वाजता मटका जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. प्रकरणी विजय गुंड पाटील (वय 57), रा. सातवणे, ता. चंदगड, सुनील कोठारी (वय 45), रा. चंदगड, यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत 11,900 रुपयांची भारतीय चलनी नोटा, पिवळ्या, पांढऱ्या व निळ्या रंगाच्या कागदावर इंग्रजी अक्षरात लिहिलेल्या आकड्यांच्या 32 चिठ्ठ्या, मटका आकड्यांच्या नोंदी असलेली दोन पुस्तके, तसेच साप्ताहिक कागदपत्रे जप्त करण्यात आली. याशिवाय 10 हजार रुपये किमतीचा पोको कंपनीचा मोबाईल फोन, दोन बॉलपेन, एक स्टेपलर व चार कार्बन कागद असा मुद्देमालही पोलिसांनी ताब्यात घेतला.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींकडून मटका जुगाराच्या आकड्यांवर लोकांकडून पैसे घेऊन चिठ्ठ्या देण्यात येत होत्या. याप्रकरणी चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 280/2026, महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.




