वर्कशॉपमध्ये बस सुरू करून बाहेर काढताना दुर्घटना;
उपसंपादक: श्री स्वप्निल कुंभार.
कोल्हापूर :कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक (सीबीएस) येथील एसटी डेपोच्या वर्कशॉपमध्ये बसच्या कामादरम्यान झालेल्या दुर्घटनेत एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. शनिवारी, १५ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे १०.५५ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी बसचालक सिकंदर मनेर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हातकणंगले तालुक्यातील भादोली येथील ५३ वर्षीय कर्मचारी वर्कशॉपमध्ये एमएच १४ केक्यू ९१५६ क्रमांकाच्या एसटी बसवर काम करण्यासाठी गेले होते. बसचे काम पूर्ण झाल्यानंतर ती रॅम्पमधून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू होती.

यावेळी बसचालक सिकंदर मनेर यांनी बस सुरू करून पुढे घेतली. बस पुढे जात असताना संबंधित कर्मचारी बसच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. संपूर्ण घटना वर्कशॉपमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेतले आहे.
बस सुरू करण्यापूर्वी वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पूर्वसूचना देण्यात आली होती का, तसेच बस बाहेर काढताना आवश्यक सुरक्षा खबरदारी घेण्यात आली होती का, याचा तपास शाहूपुरी पोलिसांकडून सुरू आहे.
सीबीएस डेपोच्या वर्कशॉपमध्ये मोठ्या वाहनांची नियमित ये-जा सुरू असते. अशा ठिकाणी सुरक्षा नियमांचे पालन आणि समन्वय किती महत्त्वाचा आहे, हे या दुर्घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाले आहे.


