बेबीताईचा ६० वर्षांचा वनवास अन् १० वर्षांचा शारीरिक त्रास संपला..!
उपसंपादक: श्री स्वप्निल कुंभार (चंदगड आजरा, गडहिंग्लज)
प्रतिनिधी: संपत सावंत.
केसांच्या अस्वच्छतेमुळे डोक्यावर झालेला केसांचा गुंता म्हणजे ‘देवाची अवकृपा’ किंवा ‘देवाची बाई’ असा कपोलकल्पित गैरसमज करून घेत समाजाने आणि पतीने वाळीत टाकलेल्या ७६ वर्षीय बेबीताई रामचंद्र लोहार (रा. इंचनाळ, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) यांची अखेर अंधश्रद्धेच्या मानसिक आणि शारीरिक ओझ्यातून कायमची मुक्तता झाली . महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे त्यांच्या डोक्यावरील भल्या मोठ्या जटेचे यशस्वी निर्मूलन करण्यात आले.
अंधश्रद्धेने उद्ध्वस्त केला संसार
सुमारे ६० वर्षांपूर्वी बेबीताईंचा विवाह मडीलगे येथे झाला होता. विवाहानंतर आजारपणाच्या काळात डोक्यावर केसांची योग्य निगा न राखल्याने गुंता होऊन जट निर्माण झाली. “ही देवाची बाई आहे, आपल्या घराचे काहीतरी वाईट करेल,” या भ्रामक अंधश्रद्धेपोटी पतीने आणि सासरच्या लोकांनी त्यांना घरातून बाहेर काढले. पतीने दुसरे लग्न करून संसार थाटला, तर बेबीताईंचे आयुष्य माहेरी अंधकारमय झाले.
१० वर्षांपूर्वी ‘अंनिस’चे प्रा. सुभाष कोरे व प्रा. प्रकाश भोईटे यांनी त्यांची जट काढली होती. मात्र, वाढत्या वयात पुन्हा केसांची योग्य निगा न राखल्यामुळे गेल्या १० वर्षांत त्यांच्या डोक्यावर पुन्हा भल्या मोठ्या जटेचा गुंतातयारझाला. यामुळे मानदुखी, पाठदुखी आणि अंगाखाली जट येत असल्याने नीट झोपताही न येणे, अशा तीव्र शारीरिक वेदना त्या सहन करत होत्या.

प्रबोधनाची कात्री आणि जटामुक्ती
या त्रासाची माहिती मिळताच अंनिसचे गडहिंग्लज कार्याध्यक्ष प्रा. सुभाष कोरे, राज्य कार्यकारणी सदस्य प्रा. प्रकाश भोईटे, तुकाराम कोलेकर महाविद्यालय नेसरी येथील एनएसएस प्रमुख प्रा. डॉ. माधव भोसले आणि क्रीडा शिक्षक श्री संपत सावंत यांनी प्रथम कुटुंबीयांसह बेबीताई यांचे प्रबोधन करून मनातील अंधश्रद्धेची जळमटी काढून टाकली आणि मग जटेचे निर्मूलन केले यावेळी शांताबाई धनाजी लोहार, सुनील धनाजी लोहार ,विनायक धनाजी लोहार ,नातू श्री सुजल सुनील सुतार मुंबई, श्रीमती धोंडू बाई तुकाराम इंगवले, काशवा गणपती लोहार, यांच्यासह काही ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते.

