हॉटेल सूर्याच्या टेरेसवर पोलिसांची कारवाई; ५२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त.

उपसंपादक : श्री.स्वप्निल कुंभार (चंदगड)
शिनोळी (ता. चंदगड) येथील बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील हॉटेल सूर्याच्या टेरेसवर सुरू असलेल्या पत्त्यांच्या जुगारावर चंदगड पोलिसांनी गुरुवारी (दि. १३ ऑगस्ट) छापा टाकला. या कारवाईत जुगार खेळणाऱ्या आठ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून एकूण ५२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल सूर्याच्या ओपन टेरेसवर काही जण पैशांची पैज लावून ‘तीन पानी’ पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी सुमारे ४.२० वाजता पोलिसांनी तेथे छापा टाकला. कारवाईदरम्यान संतोष नागाप्पा तेरणी (वय ३५, रा. बैन्नाळी, बेळगाव), मोहम्मद रेहमान हनीफ जमादार (वय ८०, रा. उचगाव, बेळगाव), इम्तियाज महम्मद सनदी (वय ५६, रा. अनगोळ गल्ली, उचगाव), मोहसीन मेहबूब शेख (वय २८, रा. उचगाव), नागेश महादेव सुरंगे (वय ३५, रा. शिनोळी बुद्रुक), परशराम निंगाप्पा घोळसे (वय ५३, रा. डुक्करवाडी, रामपूर), मोहेतेश फर्नांडिस (वय ५४, रा. उचगाव) तसेच अंदाजे ४५ वर्षीय एका अनोळखी व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले.

या कारवाईत ८ हजार ४०० रुपये रोख, ४४ हजार रुपये किमतीचे सात मोबाईल हँडसेट आणि ५२ पत्त्यांची पाने असा एकूण ५२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७२/२०२६, महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


