तडीपारीच्या कारवाईने चंदगडच्या सामाजिक-राजकीय वर्तुळात खळबळ.

श्री. स्वप्निल कुंभार. (उपसंपादक):(चंदगड, आजरा, गडहिंग्लज)
चंदगड तालुक्यातील सामाजिक व राजकीय आंदोलनांमध्ये सक्रिय असलेले ऍड . संतोष मळवीकर यांना पुढील सहा महिन्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून तडीपार करण्याची कारवाई करण्यात आली आहे. बुधवार, १२ ऑगस्ट रोजी चंदगड पोलिसांनी या कारवाईसंदर्भातील आदेश बजावल्याची माहिती समोर आली असून, त्यामुळे तालुक्यातील सामाजिक व राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
शेतकरी, विद्यार्थी, आरोग्य कर्मचारी तसेच रस्त्यांसह विविध सार्वजनिक प्रश्नांवर अॅड. संतोष मळवीकर यांनी यापूर्वी अनेक मोर्चे व आंदोलने केली आहेत. सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे भूमिका मांडणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून प्रश्नांची दखल घेतली जावी, यासाठी त्यांनी विविध माध्यमांतून आवाज उठविल्याचे वृत्त आहे.
तालुक्यातील विविध आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अॅड. मळवीकर यांच्याविरुद्ध काही गुन्हे दाखल झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. त्यापैकी एका प्रकरणाच्या अनुषंगाने चंदगड पोलिसांनी एप्रिल महिन्यात तडीपारीची अंतिम नोटीस बजावली होती. या कारवाईविरोधात त्यांनी न्यायालयीन दाद मागितली होती.

दरम्यान, संबंधित प्राधिकरणाकडून त्यांना सहा महिन्यांसाठी जिल्ह्याबाहेर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. आदेशाची अंमलबजावणी करत चंदगड पोलिसांनी बुधवारी त्यांना तडीपारीच्या आदेशाची माहिती दिली.
अॅड. संतोष मळवीकर हे चंदगड तालुका बार असोसिएशनचे अध्यक्षपद भूषविले असल्याचे वृत्तात नमूद आहे. तसेच ते चंदगड पंचायत समितीच्या उपसभापती संज्योती मळवीकर यांचे पती आहेत. त्यामुळे या कारवाईला तालुक्यातील सामाजिक आणि राजकीय पातळीवरही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आवाज उठविणाऱ्या व्यक्तीला सहा महिन्यांसाठी जिल्ह्याबाहेर केल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दुसरीकडे, तडीपारीच्या कारवाईमागील कायदेशीर प्रक्रिया आणि प्रशासनाची भूमिका याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
या कारवाईनंतर आगामी काळात चंदगड तालुक्यातील सामाजिक तसेच राजकीय वातावरणावर त्याचा काय परिणाम होतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. अॅड. संतोष मळवीकर यांच्याकडून या कारवाईबाबत पुढील भूमिका काय घेतली जाते, हेही महत्त्वाचे ठरणार आहे.




