बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणात तपासाची व्याप्ती वाढली; ५० महिलांची नावे पोलिसांच्या रडारवर


मदतनीससह चौकशी तीव्र; बँक पासबुक, चेकबुक व महत्त्वाची कागदपत्रे जप्त

कोल्हापूर | प्रतिनिधी : श्री. स्वप्निल कुंभार.

कदमवाडी रोडवरील भीमनगर हाउसिंग सोसायटी येथील प्रतिमा हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. चंद्रकांत गंगाराम गायकवाड याच्यासह त्याचा मदतनीस शब्बीर जुनेदीन हजारी यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.

तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीच्या निवासस्थान व दवाखान्यात पंचनामा करून चेकबुक, बँकेचे पासबुक, ओळखपत्रे, लेटरहेड, प्रिस्क्रिप्शन व इतर महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. प्राथमिक तपासात गर्भपातासाठी आलेल्या ५० महिलांची नावे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी या महिलांशी संपर्क साधून त्यांच्या जबाबांची नोंद घेण्यास सुरुवात केली असून, गर्भपाताची प्रक्रिया नेमकी कशी राबवली जात होती, याचा तपास सुरू आहे. तसेच या प्रकरणात इतर कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

दरम्यान, डॉ. गायकवाड यांनी काही औषध दुकानांतून औषधे व वैद्यकीय साहित्य खरेदी केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यासाठी प्रिस्क्रिप्शन कोणाच्या नावावर देण्यात आले होते, याचीही चौकशी सुरू आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणात आर्थिक व्यवहार, औषध पुरवठा आणि संबंधित व्यक्तींची भूमिका तपासली जात असून, दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.


3
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!