कर्नाटकी हिवाळी अधिवेशनाला महामेळाव्याने सणसणीत प्रत्युत्तर देणार; २ डिसेंबरसाठी सीमाभागात रणशिंग फुंकले!


कर्नाटकी हिवाळी अधिवेशनाला महामेळाव्याने सणसणीत प्रत्युत्तर देणार

२ डिसेंबरसाठी सीमाभागात रणशिंग फुंकले!

खानापूर : प्रतिनिधी

कर्नाटकी हिवाळी अधिवेशनाच्या अन्यायकारक दडपशाहीला बहुसंख्येने एकत्र येऊन सणसणीत प्रत्युत्तर देण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने रणशिंग फुंकले आहे. आगामी २ डिसेंबर रोजी आयोजित महामेळावा ऐतिहासिक करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कंबर कसावी आणि संयुक्त महाराष्ट्राचा धगधगता लढा अधिक तीव्र करावा, असा बुलंद निर्धार मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी श्री राजा शिवस्मारक, खानापूर येथे पार पडलेल्या समितीच्या कार्यकारिणी बैठकीत व्यक्त करण्यात आला. समितीचे अध्यक्ष गोपाळराव बळवंतराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि जोश पाहायला मिळाला.

बैठकीच्या प्रारंभी समितीचे सरचिटणीस आबासाहेब नारायणराव दळवी यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. या वेळी सीमाप्रश्नासाठी आयुष्य वेचलेल्या आणि समितीच्या दिवंगत कार्यकर्त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

माजी आमदार दिगंबरराव पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना कर्नाटक सरकारच्या विरोधात आयोजित महामेळावा यशस्वी करण्यासाठी तालुकाभर तुफानी जनजागृती करण्यावर भर दिला. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केलेल्या आवाहनाला प्रचंड पाठिंबा देऊन महामेळाव्यात लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे. या माध्यमातून महाराष्ट्रात समाविष्ट होण्याची सीमाभागातील जनतेची प्रबळ भावना कर्नाटक, महाराष्ट्र तसेच केंद्र सरकारच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी एकजुटीने वज्रमूठ आवळूया, असे आवाहन त्यांनी केले.

या वेळी गोपाळ मुरारी पाटील, मारुतीराव परमेकर, मुरलीधर पाटील, प्रकाश चव्हाण, राजाराम देसाई, पांडुरंग सावंत, जयराम देसाई, जगन्नाथ बिरजे, पुंडलिक पाटील, विलास बेळगावकर, धनंजय पाटील, गणपती पाटील (पुणे) आदींनी आपले विचार मांडले. २ डिसेंबर रोजी होणारा महामेळावा गनिमी काव्याने व चोख नियोजनबद्ध पद्धतीने यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित झोकून देऊन काम करावे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

अध्यक्षीय भाषणात गोपाळराव देसाई यांनी २ डिसेंबरचा महामेळावा हा सीमावासियांच्या अस्तित्वाची लढाई असून, तो यशस्वी करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने तन-मन-धनाने सहकार्य करावे, असे आवाहन केले. शेवटी सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी आभार मानले.

सत्तालोभापोटी समिती सोडणाऱ्यांना खरमरीत इशारा; मूळ प्रवाहात परतण्याचे आवाहन

या वेळी बोलताना वक्त्यांनी आणि कार्यकर्त्यांनी समिती सोडून गेलेल्या नेत्यांचा खरमरीत शब्दांत समाचार घेतला. “ज्या मायमराठीने आणि महाराष्ट्र एकीकरण समितीने तुम्हाला ओळख दिली, नेतृत्व दिले, त्या समितीशी प्रतारणा करून वैयक्तिक स्वार्थासाठी आणि सत्तालोभापोटी राष्ट्रीय पक्षांच्या दावणीला बांधले जाणे हे सीमावासियांच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखे आहे. इतिहास अशा संधिसाधूंना कधीही माफ करणार नाही. अजूनही वेळ गेलेली नाही; गद्दारीचा कलंक पुसून मायमराठीच्या अस्मितेसाठी आणि सीमाभागाच्या न्याय्य हक्कासाठी तात्काळ समितीच्या मूळ प्रवाहात परत या,” अशा परखड शब्दांत समिती सोडलेल्या नेत्यांना सुनावण्यात आले.

या बैठकीला राजेंद्र कुलम, ब्रह्मानंद पाटील, रूक्माणा झुंजवाडकर, संजीव पाटील, बी. बी. पाटील, डी. एम. भोसले, जयसिंगराव पाटील, सातेरी पाटील, अजित पाटील, बाळासाहेब शेलार, विनायक चव्हाण, नाना घाडी, वसंत नावलकर, रवींद्र शिंदे, म्हात्रू धबाले, नामदेव गोरे, दत्तू कुट्रे, शिवाजी पाटील, सुहास हुद्दार, उमेश पाटील यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertise

Advertise


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!