१५ हजार रुपये पगारवाढीसाठी आशा कार्यकर्त्यांचे अहोरात्र आंदोलन
राजू कुंभार: नागुर्डा
किमान मासिक मानधन १५ हजार रुपये करावे आणि केवळ आश्वासने न देता त्याबाबतचा अधिकृत शासन आदेश (जीआर) तात्काळ काढावा, या मागणीसाठी आशा कार्यकर्त्यांनी बंगळुरूच्या फ्रीडम पार्कवर सुरू केलेले आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार आंदोलक कार्यकर्त्यांनी केला आहे.
राज्याच्या विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने आलेल्या आशा कार्यकर्त्यांनी बंगळुरूतील कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता आंदोलनस्थळीच मुक्काम ठोकला आहे. काही कार्यकर्त्या आपल्या लहान मुलांना सोबत घेऊन या अहोरात्र धरणे आंदोलनात सहभागी झाल्याचे हृदयस्पर्शी चित्र पाहायला मिळत आहे.
मंत्र्यांची आंदोलनस्थळी भेट
काल रात्री आरोग्य मंत्री यू. टी. खादर यांनी फ्रीडम पार्क येथे जाऊन आंदोलक कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या मागण्यांबाबत मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, केवळ तोंडी आश्वासनांवर समाधान न मानता, जोपर्यंत सरकार अधिकृत आदेश काढत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा ठाम पवित्रा आशा कार्यकर्त्यांनी घेतला आहे.
सरकारच्या निर्णयाकडे लक्ष
ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य सेवेचा कणा असलेल्या आशा कार्यकर्त्या आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. आता राज्य सरकार यावर काय अधिकृत भूमिका घेते आणि हे आंदोलन पुढे कोणते वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेआहे.
Advertise

Advertise


