तक्रारींवर ४८ तासांत कार्यवाहीचे निर्देश; दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा.

गडहिंग्लज प्रतिनिधी: श्री स्वप्निल कुंभार.
गडहिंग्लज शहरातील नागरिकांना आता आपल्या नागर समस्या थेट नगरपालिकेपर्यंत पोहोचवता येणार आहेत. यासाठी नगरपालिका प्रशासनाने एक स्वतंत्र व्हॉट्सॲप क्रमांक सुरू केला असून, ९४०४०५५८५४ या क्रमांकावर स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्त्यावरील खड्डे यांसह पालिकेशी संबंधित विविध समस्यांची छायाचित्रे व माहिती पाठवता येणार आहे.
शहरातील विविध नागरी समस्यांबाबत आयोजित पत्रकार परिषदेत प्रभारी नगराध्यक्ष महेश सलवादे बोलत होते. शहरातल्या समस्यांवर सोशल मीडियावर सातत्याने चर्चा होते, मात्र अनेकदा या तक्रारी प्रत्यक्षात पालिकेपर्यंत पोहोचत नसल्याने त्यावर कारवाई करणे शक्य होत नाही. ही अडचण दूर करण्यासाठी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याचे सलवादे यांनी सांगितले. प्राप्त तक्रारी संबंधित विभागाकडे पाठवून त्यावर ४८ तासांत कारवाई करणे बंधनकारक राहणार आहे. निर्धारित वेळेत कारवाई न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

विकासकामे आणि पाणीपुरवठा योजनेला गती:
दरम्यान, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आमदार हसन मुश्रीफ यांनी शहरातील विकासकामांसाठी २ कोटी ७० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला असून, या निधीतून शहरातील रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. तसेच शहरातील पाणीपुरवठा योजना ७३ टक्के पूर्ण झाली असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या परवानगीभावी उर्वरित कामाला विलंब होत आहे. मार्च २०२७ अखेर ही योजना पूर्ण करून गडहिंग्लजकरांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाणीपुरवठा योजनेचा आराखडा तयार करताना काही किरकोळ त्रुटी राहिल्याने प्रत्यक्ष अंमलबजावणीदरम्यान नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, आता त्यावर टीकाटिप्पणी करण्यापेक्षा नागरिकांचे सहकार्य घेऊन योजना पूर्ण करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही सलवादे यांनी सांगितले.
यावेळी मुख्याधिकारी देवानंद ढेकळे, बांधकाम सभापति गुंडू उर्फ रामगोंडा पाटील, नगरसेवक बसवराज खणगावे, अमर मांगले, संतोष चिकोडे, अण्णासाहेब देवगोंडा, दीपक कुराडे आदी उपस्थित होते.

