दुपारच्या सुमारास घडलेल्या घटनेने परिसरात दहशत; नागरिकांनी दागिन्यांची योग्य काळजी घेण्याचे चंदगड पोलिसांचे आवाहन
चंदगड प्रतिनिधी: श्री स्वप्निल कुंभार.
चंदगड तालुक्यातील नागरदळे गावात भरदिवसा घरफोडीची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्याने लहान कटावणीच्या साहाय्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत तब्बल १ लाख ९० हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले आहेत. या घटनेमुळे नागरदळे व आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.
चंदगड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, नागरदळे (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथील रहिवासी भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या जवानाचे घर अवघ्या अर्ध्या तासात लुटल्याची घटना समोर आली आहे. सौ. पुजा रामदास पाटील (वय ३०, व्यवसाय: गृहिणी) यांनी चंदगड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दि. ११ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १२.१५ या कालावधीत कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. हीच संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचे कुलूप लहान कटावणीने तोडले आणि घरात प्रवेश केला. घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्याने कपाटातील सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने चोरून पोबारा केला. याप्रकरणी सौ. पुजा पाटील यांनी दि. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी चंदगड पोलीस ठाण्यात धाव घेत रीतसर तक्रार दाखल केली.
चोरीला गेलेला १ लाख ९० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल:
चांदीचे पैंजण: ७ तोळे वजनाचे जुने वापरते किमती साधारण १०,५००/- रुपये.
सोन्याचे कानातील टॉप्स व लटकन: ५ ग्रॅम वजनाचे जुने वापरते किमती साधारण ६०,०००/- रुपये.
सोन्याचे कानातील रिंग (१ जोड): ५ ग्रॅम वजनाचे जुने वापरते किमती अंदाजे ६०,०००/- रुपये.
सोन्याचे मणीमंगळसूत्र: ५ ग्रॅम वजनाचे जुने वापरते किमती अंदाजे ६०,०००/- रुपये.
पोलिसांची कारवाई आणि तपास:
याप्रकरणी चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३६८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(अ), ३३१(३), आणि ३(५) प्रमाणे अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहेकॉ २०६३ कांबळे यांनी हा गुन्हा दाखल करून घेतला असून, गुन्ह्याची प्रत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, चंदगड यांच्या न्यायालयात रवाना करण्यात आली आहे. माननीय पोलीस निरीक्षक श्री नामदेव शिंदे साहेब यांच्या आदेशाने या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक (पोउपनि) शेख हे अत्यंत वेगाने करत आहेत. अद्याप कोणताही मुद्देमाल हस्तगत झालेला नसून पोलिसांकडून चोराचा कसून शोध सुरू आहे.
परिसरात भीतीचे सावट:
चोरीची ही घटना रात्रीच्या अंधारात नव्हे, तर चक्क सकाळी ११.३० ते दुपारी १२.१५ या भरदिवसाच्या वेळेत घडल्याने परिसरातील नागरिक कमालीचे धास्तावले आहेत. दिवसाढवळ्या चोरटे इतक्या धाडसाने कुलूप तोडून घरात घुसत असतील, तर घर बंद ठेवून शेतात किंवा बाजारहाटासाठी बाहेर कसे पडायचे, असा गंभीर प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा राहिला आहे. विशेषतः घरात एकट्या राहणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी यासाठी विशेष दक्षता घ्यावी अशा पद्धतीचे आवाहन सर्वसामान्य नागरिक व गावापासून दूर राहत असलेल्या शेतातील व्यक्ती व नागरिकांसाठी केले आहे.


