विश्रांतवाडीत मध्यरात्री थरार! समाजकंटकांकडून घरासमोरील दुचाकी पेटवून देत दहशत माजवण्याचा प्रयत्न


विश्रांतवाडीत मध्यरात्री थरार! समाजकंटकांकडून घरासमोरील दुचाकी पेटवून देत दहशत माजवण्याचा प्रयत्न

नागुर्डा : राजू कुंभार

विश्रांतवाडी (नागुर्डा) येथे मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी घराच्या आवारात उभी असलेली दुचाकी पेटवून दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. बुधवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारात जोतिबा (भय्या) चव्हाण यांची दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली असून, त्यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या काही युवकांच्या नजरेस हा प्रकार पडताच त्यांनी तात्काळ गावकऱ्यांना याची माहिती दिली. ग्रामस्थांनी धाव घेत तातडीने आग आटोक्यात आणल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. आगीने रौद्ररूप धारण केले असते, तर शेजारील नागेश देव सोसायटी आणि बाजूचे सायकल दुकान आगीच्या भक्षस्थानी पडून मोठी जीवित व वित्तहानी झाली असती.

पाळत ठेवून कृत्य केल्याचा संशय; परिसरात दहशतीचे वातावरण

दहशत माजवण्याच्या आणि धमकी देण्याच्या उद्देशानेच समाजकंटकांनी पाळत ठेवून थेट घराच्या आवारात घुसून हा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या कृत्यामागे शेजारच्या गावातीलच एका तरुणाचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व भीतीचे वातावरण पसरले आहे.

पोलिसांकडून कसून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. आज (गुरुवारी) पोलीस उपनिरीक्षक निरंजन यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून, याप्रकरणी पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

Advertise

Advertise


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!