भैरु पाटील यांचे नाव काँग्रेसकडून आघाडीवर; भाजप व म. ए. समितीच्या अडचणी वाढल्या!


भैरु पाटील यांचे नाव काँग्रेसकडून आघाडीवर

भाजप व म. ए. समितीच्या अडचणी वाढल्या!

राजू कुंभार: खानापूर

सहकार, शिक्षण, कला, क्रीडा आणि समाजसेवा यांसारख्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणारे जांबोटी भागातील अष्टपैलू आणि उच्चशिक्षित (B.E., M.Tech) व्यक्तिमत्त्व श्री. भैरु वाघू पाटील यांचे नाव तालुका काँग्रेसकडून जांबोटी जिल्हा पंचायत (ZP) निवडणुकीसाठी सर्वात आघाडीवर चर्चेत आले आहे. त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे अधिकृत अर्ज दाखल केल्यामुळे विरोधकांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील भरीव कार्य:

इंजिनिअर असलेले भैरु वाघू पाटील हे गेल्या बारा वर्षांपासून जांबोटी भागात शिक्षण, क्रीडा, कला आणि सामाजिक उपक्रमांमध्ये अत्यंत सक्रिय आहेत. जांबोटी को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक म्हणून ते यशस्वीपणे जबाबदारी पार पाडत आहेत. जांबोटी भागात ते एक ‘शिक्षणप्रेमी’ म्हणून विशेष ओळखले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी जांबोटी भागातील दहावीच्या परीक्षेत ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा मोलाचा प्रयत्न केला आहे. इतकेच नव्हे तर, ज्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता होती, त्या शाळांना स्वतः भेट देऊन शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आहेत. शिक्षणासोबतच आध्यात्मिक आणि क्रीडा क्षेत्रालाही त्यांनी अनेक गावांमध्ये मोलाचे सहकार्य केले आहे.

काँग्रेसमधील प्रवेश आणि जनसंपर्क

मागील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी ‘आप’ (AAP) या राष्ट्रीय पक्षाच्या तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा देत, माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला होता. पक्षा प्रवेशानंतर त्यांनी जांबोटी भागातून काँग्रेसला सर्वाधिक मते मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. जांबोटी परिसरातील प्रत्येक गावाशी त्यांचा अत्यंत घनिष्ठ आणि जिव्हाळ्याचा संबध आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांची जोरदार मागणी आणि विरोधकांची डोकेदुखी:

जांबोटी जिल्हा पंचायत मतदारसंघात भाजप आणि महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये अंतर्गत बंडाळीची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अशा राजकीय परिस्थितीचा फायदा काँग्रेस पक्षाला निश्चितच होणार असून, भागाच्या सर्वांगीण विकासासाठी अशा सुशिक्षित व तडफदार उमेदवाराला संधी दिल्यास मतदारसंघाचा कायापालट होईल, असा ठाम विश्वास जांबोटीच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. भैरु पाटील यांच्या उमेदवारीच्या चर्चांमुळे भाजप आणि म. ए. समितीची खरी डोकेदुखी वाढली आहे.

Advertise

Advertise


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!