५ वर्षांवरील बालकांसाठी सुवर्णसंधी; शारीरिक तंदुरुस्तीसोबतच कौशल्य विकासावर विशेष भर.
गडहिंग्लज प्रतिनिधी: श्री स्वप्निल कुंभार.
दिवाळीच्या सुट्ट्यांचा सदुपयोग करून मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी, तसेच आरोग्य आणि क्रीडा कौशल्यांचा विकास व्हावा, या उद्देशाने गडहिंग्लज परिसरामध्ये सॉकर ट्रेनिंग सेंटर (एसटीसी)च्या वतीने ६ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत एका भव्य दिवाळी विशेष फुटबॉल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात ५ वर्षांवरील सर्व लहान मुले व मुली सहभाग घेऊ शकणार आहेत.
शिबिराचे मुख्य आकर्षण व मार्गदर्शन:
या शिबिरादरम्यान तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून फुटबॉलचे मूळ तंत्र, बॉल कंट्रोल, पासिंग, ड्रिब्लिंग, शूटिंग, डिफेन्स तसेच खेळाडूंची शारीरिक क्षमता, चपळता आणि समवयस्क समन्वय वाढवण्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. खेळाडूंच्या वयानुसार त्यांच्या प्रशिक्जनाचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. तसेच वाढत्या मोबाईल वापराच्या विळख्यातून मुलांना बाहेर काढून हिरव्यागार मैदानाकडे आकर्षित करणे आणि भविष्यात जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. फुटबॉलच्या नियमित सरावामुळे मुलांमध्ये शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण, आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि खिलाडूवृत्ती यांसारख्या गुणांचा विकास होतो. याशिवाय तज्ज्ञांमार्फत योग्य आहार आणि पोषणमूल्याबाबत मार्गदर्शनही केले जाणार आहे.
शिबिराचा सविस्तर तपशील:
कालावधी: ६ ते १५ नोव्हेंबर २०२६
वेळ: सकाळी ७ ते ९
ठिकाण: शिवराज महाविद्यालय मैदान, गडहिंग्लज
सहभागी होणारे वयोमान गट: ५ वर्षांवरील सर्व इच्छुक मुले आणि मुली
आकर्षक टी-शर्ट आणि सहभाग प्रमाणपत्र:
या शिबिरात सहभागी होणाऱ्या सर्व नोंदणीकृत खेळाडूंना आयोजकां तर्फे आकर्षक टी-शर्ट आणि अधिकृत सहभाग प्रमाणपत्र भेट म्हणून दिले जाणार आहे.
आवाहन आणि संपर्क:
“या दिवाळीत सुट्टी नाही, फुटबॉलची धमाल!” आणि “चला तर मग, यावर्षीची दिवाळी सुट्टी बनवू फुटबॉल वाली!” अशा जोशपूर्ण घोषणांसह हे शिबिर आयोजित करण्यात आले असून जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलांना याचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन आयोजक बाबासाहेब कसाळे, डॉ. राहुल मगदूम आणि प्रा. जयवंत पाटील यांनी केले आहे. शिबिराचे प्रवेश मर्यादित असून नावनोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी किरण कावणेकर, इम्रान बांदार आणि ओकार पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

