गडहिंग्लजमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक हॉलची दयनीय अवस्था; प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात कारवाईचा इशारा


सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; १५ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचा इशारा.

गडहिंग्लज प्रतिनिधी: श्री स्वप्निल कुंभार.

गडहिंग्लज नगरपरिषदेच्या मालकीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक हॉलची अत्यंत दयनीय आणि बिकट अवस्था झाली असून, या इमारतीच्या सुरक्षिततेबद्दल आता गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. हॉलच्या परिसरात वाढलेली झाडेझुडपे, फुटलेल्या फर्श्या, भिंतींना पडलेल्या खोल भेगा आणि उघड्या पडलेल्या विद्युत वाहिनीमुळे (वायरिंग) नागरिक व उपस्थितांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व गंभीर बाबींकडे लक्ष वेहत नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.  

​सामाजिक कार्यकर्ते अजहर बोजगर यांनी या सांस्कृतिक हॉलची प्रत्यक्षात पाहणी करून जीपीएस लोकेशनसह ७ छायाचित्रे पुरावा म्हणून निवेदनासोबत जोडली आहेत. हॉलच्या परिसरात २ ते ३ फूट उंच रानटी गवत, झुडपे आणि कचर्याचे साम्राज्य पसरले आहे. तसेच, इमारतीच्या बाह्य भिंतींचे प्लास्टर उखडले असून प्रवेशद्वारातच गंजलेली लोखंडी फ्रेम पडलेली आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या पिलरवर शेवाळ साचले असून तिथे झाडही उगवले असल्याचे दिसून येते.  

​तसेच हॉलमधील फर्श्या आणि पायऱ्या तुटलेल्या असून आतील भिंतींना खोल भेगा पडल्या आहेत व पडदेही फाटले आहेत. उघड्या विद्युत वायरिंगमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.  

​या पार्श्वभूमीवर, नगरपरिषदेने ७ दिवसांत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून लेखी अहवाल तयार करावा, इमारतीचे स्ट्रक्चरल सेफ्टी ऑडिट करावे, धोकादायक भागांची दुरुस्ती करावी आणि परिसराची स्वच्छता करावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक मालमत्तेची देखभाल करण्याची मुख्य जबाबदारी नगरपरिषदेची असल्याचेही निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. जर पुढील १५ दिवसांत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई किंवा लेखी उत्तर मिळाले नाही, तर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यासह माहिती अधिकारांतर्गत संबंधित माहिती मागवण्याचा कडक इशारा अजहर बोजगर यांनी दिला आहे.  

​या निवेदनावर प्रताप मोहिते, सुदर्शन चव्हाण, संदीप कुरळे, अमित पाटील आणि यासीन नाईकवाडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.  


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!