
श्रद्धा, ध्येय, कष्ट, आत्मविश्वास आणि सातत्य हीच यशाची पाच सूत्रे : पिटर डिसोझा
खानापुरात ‘कै. श्रीमती पद्मजादेवी हलगेकर स्पर्धा परीक्षा केंद्राचे’ दिमाखदार उद्घाटन
खानापूर:राजू कुंभार
“विद्यार्थ्यांच्या जीवनात पालक आणि शिक्षकांचे स्थान अनन्यसाधारण असते. विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात श्रद्धा, ध्येय, कष्ट, आत्मविश्वास आणि सातत्य ही यशाची पाच सूत्रे आत्मसात करून निरंतर पुढे जावे,” असे प्रतिपादन पुण्याचे नामवंत वास्तूविशारद श्री. पिटर डिसोझा यांनी केले.
मराठा मंडळ संचालित म. म. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयात खानापूर तालुका व बेळगाव जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थिनींना युपीएससी (UPSC), एमपीएससी (MPSC), केपीएससी, केएएस, बँकिंग आणि अग्निवीर एअरफोर्ससारख्या स्पर्धा परीक्षांची पायाभरणी करता यावी, यासाठी ‘कै. श्रीमती पद्मजादेवी हलगेकर स्पर्धा परीक्षा केंद्राचे’ शानदार उद्घाटन नुकतेच संपन्न झाले.
श्री. पिटर डिसोझा आणि गर्लगुंजी गावचे माजी ग्राम पंचायत सदस्य श्री. प्रसाद विठ्ठल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि संस्थेचे संचालक श्री. शिवाजी पाटील यांच्या शुभहस्ते हे ज्ञानदालन होतकरू विद्यार्थिनींना अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात व प्रास्ताविक:
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या मंगलमय प्रार्थनागीताने झाली. त्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि कै. श्रीमती पद्मजादेवी हलगेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवर, पालक व विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रा. पी. व्ही. कर्लेकर यांनी प्रास्ताविकातून या उपक्रमामागील संकल्पना व भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे पिटर डिसोझा, प्रसाद पाटील व शिवाजीराव पाटील यांचा प्राध्यापक व पालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
युपीएससी परीक्षेचे स्वरूप, तयारीची पद्धत, अभ्यासातील सातत्य आणि प्रशासकीय सेवेसाठी आवश्यक असणारी जिद्द याविषयी श्री. प्रसाद पाटील यांनी अत्यंत सखोल व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
उपक्रमाचा उद्देश व ग्रंथालयाची वैशिष्ट्ये:
आजच्या काळात मोबाईलचा मोह आणि अनाठायी वापर टाळून विद्यार्थिनींनी महाविद्यालयीन शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षांचा प्रभावी अभ्यास करावा, हा या केंद्रामागील मुख्य उद्देश आहे. या केंद्रासाठी पुणे, बेंगळुरू आणि मुंबई येथील दर्जेदार ज्ञानकोश व संदर्भग्रंथांची उपलब्धता श्री. शिवानंद चन्नेवाडकर व श्री. पिटर डिसोझा यांच्या सहकार्यातून करण्यात आली आहे.
तसेच, श्री. प्रसाद पाटील यांनी या स्पर्धा केंद्रासाठी २५,००० रुपयांची पुस्तके व स्पर्धा साहित्य देण्याची सढळहस्ते घोषणा केली. या ग्रंथालयात Word Power Made Easy, माझी पदवी माझे करिअर, जनरल इंग्लिश, जीके २०२७, एनसीईआरटी पुस्तक संच, तात्याचा ठोकळा, प्रतियोगिता दर्पन, विझार्ड यांसारख्या शेकडो दर्जेदार स्पर्धा पुस्तके आणि मासिकांचा समावेश करण्यात आला आहे.
खानापूर तालुक्यातील हे पहिले पदवीपूर्व महाविद्यालय असून, योग्य वयात विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक दृष्टिकोन मिळवून देणारा हा उपक्रम विद्यार्थिनींच्या स्वप्नांना नवे पंख देईल,” असा ठाम विश्वास प्राचार्य अरविंद पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केला.
या संपूर्ण स्पर्धा परीक्षा दालनाची आणि उपक्रमाची जबाबदारी वाणिज्य विभागाचे अभ्यासू प्रा. पी. व्ही. कर्लेकर व श्रीमती एम. वाय. देसाई यांनी स्वीकारली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. वनिता गवाडे यांनी केले. महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांच्या मोलाच्या सहकार्यामुळे हा उद्घाटनाचा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्यासंपन्न झाला.
Advertise


