वर्षभराची मेहनत डोळ्यादेखत राख; महसूल व कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी
चंदगड प्रतिनिधी : श्री स्वप्निल कुंभार.
चंदगड तालुक्यातील मलतवाडी येथील तेलपट्टी शिवारात उसाच्या फडाला अचानक लागलेल्या भीषण आगीत सुमारे १० एकर क्षेत्रातील उसाचे पीक पूर्णपणे जळून खाक झाले आहे. काढणीला आलेल्या हंगामातच हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने संबंधित शेतकरी वर्गाचे अतोनात नुकसान झाले असून, यामुळे बळीराजाच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.

ऊस लागवडीपासून मशागत, खते, औषध फवारणी आणि पाण्याच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी मोठा आर्थिक खर्च केला होता. मात्र, ऐन गाळप हंगामाच्या तोंडावर आगीने संपूर्ण ऊस जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे.
आगीची महिती मिळताच स्थानिकांनी ती विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आगीत नेमके कशामुळे नुकसान झाले आणि आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आधीच वाढता उत्पादन खर्च आणि शेतीमधील अनिश्चिततेचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना या दुर्घटनेमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे.
या पार्श्वभूमीवर, महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी करावी आणि जळालेल्या उस क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी जोर धरत आहे. तसेच, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नियमानुसार तातडीने आर्थिक भरपाई देऊन दिलासा द्यावा, अशी आर्त हाक बाधित शेतकऱ्यांकडून दिली जात आहे. प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन तातडीने मदत मिळवून द्यावी, अशी आक्रमक अपेक्षा व्यक्त होत आहे.

