
आयटीआय(ITI)वाल्यांचे नशीब उजळणार! २०२७ पासून ‘मुख्यमंत्री शंभर दिवस कार्यक्रमा’तून थेट नोकऱ्यांची कवाडे खुली
राजू कुंभार: खानापूर
आयटीआयचे विविध ट्रेडचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट नोकरी आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कर्नाटक शासनातर्फे ‘मुख्यमंत्री शंभर दिवस कार्यक्रम’ राबवण्यात येणार आहे. या महत्त्वपूर्ण योजनेची अंमलबजावणी जून २०२७ पासून सुरू होणार आहे.
या उपक्रमाची शिक्षण व कार्यपद्धती समजून घेण्यासाठी कर्नाटकातील विविध सरकारी आयटीआयमधील ‘जेटीओ’ (JTO) अधिकाऱ्यांचे बेंगळुरू, मंगळुरू, कलबुर्गी आणि बिडदी येथे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.
तांत्रिक शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या नव्या योजनेमुळे दरवर्षी तब्बल ५,००० विद्यार्थ्यांना अप्रेंटिस, कंत्राटी व कायमस्वरूपी स्वरूपात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
काय होणार लाभ?
* थेट नोकरीची संधी: दरवर्षी ५,००० विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मिळतील.
भटकंती थांबणार: आयटीआय प्रवेशानंतर महाविद्यालयातच रोजगाराचे मार्गदर्शन व संधी उपलब्ध झाल्याने विद्यार्थी व पालकांची भटकंती थांबेल.
कौशल्याला रोजगाराची जोड: उद्योगांच्या गरजेनुसार प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होऊन विद्यार्थ्यांना थेट नोकरीच्या संधीपर्यंत पोहोचवणे शक्य होणार आहे.
रोजगार मेळावे: औद्योगिक संस्था आणि कंपन्यांमध्ये समन्वय वाढवून रोजगार मेळावे आयोजित केले जातील.
कौशल्यपूर्ण शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना थेट उद्योगांशी जोडून स्वावलंबी बनवण्यासाठी आणि उद्योगांना कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी हा ‘मुख्यमंत्री शंभर दिवस कार्यक्रम’ मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त केलाजात आहे.
Advertise


