दहावीच्या विद्यार्थ्यांना डॉ. प्रकाश कदम यांचा प्रेरणादायी कानमंत्र.
गडहिंग्लज प्रतिनिधी: श्री संपत सावंत.
परीक्षेला भीतीने नव्हे तर आत्मविश्वासाने सामोरे जा. शिक्षण बुद्धीला समृद्ध करते तर संस्कार मनाला सुंदर बनवतात. गुणासोबत गुणवतापूर्ण व्यक्तिमत्व घडवा. ध्येय निश्चित करा. परिश्रमाची कास धरा आणि यशाचे शिखर गाठा. ज्ञानाचा प्रकाश आणि संस्काराची शिदोरी आपल्या उज्ज्वल भविष्याला दिशा देतात असे प्रतिपादन लेखक डॉ.प्रकाश कदम यांनी विद्या प्रसारक मंडळ, गडहिंग्लज संचलित जागृती हायस्कूलमध्ये इयत्ता दहावी विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘परीक्षेला सामोरे जाताना’ तसेच ‘शिक्षण आणि संस्कार’ या विषयावर बोलताना केले. मुख्याध्यापक उमेश सावंत अध्यक्षस्थानी होते.
स्वागत व प्रास्ताविक दहावी विभाग प्रमुख सदानंद फुटाणे यांनी केले. पाहुणे परिचय संपत सावंत यांनी करून दिला. पुढे बोलताना डॉ. कदम म्हणाले ‘किशोर वय हे व्यक्तिमत्व घडविण्याचे महत्त्वपूर्ण वय असून शिक्षणासोबत संस्कार, नम्रता, आत्मविश्वास, प्रबळ इच्छाशक्ती, जिज्ञासा आणि वक्तशीरपणा जोपासा. सत्य, शिव आणि सुंदर जीवनमूल्ये आत्मसात करा. कठोर परिश्रम, प्रामाणिक अभ्यास आणि चांगल्या वर्तनातून यशस्वी होऊन आदर्श नागरिक बना.’ असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. उपमुख्याध्यापक अनिल मसाळे यांचेही भाषण झाले.
यावेळी पर्यवेक्षक महंतेश दड्डी,प्रवीण पाटील, रवींद्र भंडारे, प्रकाश गायकवाड यासह सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.कल्पना पाटील यांनी तर आभार इराप्पा मरडी यांनी मानले.

