दीड लाखांहून अधिक स्मार्ट मीटर बसवून उद्दिष्ट १००% पूर्ण; ग्राहकांच्या सहकार्य आणि विश्वासामुळे कामगिरी साध्य.
गडहिंग्लज प्रतिनिधी: श्री स्वप्निल कुंभार.
महावितरणच्या गडहिंग्लज विभागाने १ लाख ५५ हजार १८९ ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसवून निर्धारित उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण केले आहे. २७ ऑगस्ट २०२४ पासून सुरू झालेली ही नियोजनबद्ध मोहीम १३ ऑक्टोबर २०२६ रोजी यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून, या कामगिरीमुळे गडहिंग्लज विभाग स्मार्ट मीटर जोडणीत देशात प्रथम क्रमांकावर आला आहे. यामध्ये चंदगड उपविभागात सर्वाधिक ४८,३८६, गडहिंग्लजमध्ये ४२,३४०, आजऱ्यात ३७,१६९ आणि नेसरीत २७,२९४ मीटर बसवण्यात आले आहेत.

आरंभीच्या काळात स्मार्ट मीटरबाबत ग्राहक आणि लोकप्रतिनिधींमध्ये अनेक शंका होत्या. मात्र, महावितरणने गावागावांत ग्रामसभा व ग्राहक मेळावे घेऊन जनजागृती केली आणि शंकांचे निरसन केले. कार्यकारी अभियंता संजय कृष्णा पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंते व कर्मचारी पथकाने घेतलेल्या परिश्रमांमुळे ग्राहकांचा विश्वास संपादन करणे शक्य झाले. तसेच, स्मार्ट मीटरधारकांसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेतील वीज वापरावर पुढील तीन वर्षांत प्रति युनिट ८० पैसे ते ९० पैशांपर्यंत विशेष सवलत लागू करण्यात आली आहे.

या यशाचे संपूर्ण श्रेय महावितरणने आपल्या ग्राहकांच्या सहकार्याला आणि विश्वासाला समर्पित केले आहे.

