चंदगड तालुक्यात मद्यसाठा आणि कार असा ११.८८ लाखांचा मुद्देमाल जप्त


श्रीपादवाडी–कोळींद्रे फाट्यावर पोलिसांची कारवाई; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

चंदगड प्रतिनिधी: श्री स्वप्निल कुंभार.

गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक केल्याप्रकरणी चंदगड पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, या कारवाईत मद्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली टोयोटा इनोव्हा कार असा एकूण ११ लाख ८८ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चंदगड तालुक्यातील श्रीपादवाडी–कोळींद्रे गावांच्या फाट्याजवळ ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सात जणांविरुद्ध चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंदगड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी संग्रामसिंह जिवबा पाटील (वय ३९) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गोवा बनावटीचा मद्यसाठा महाराष्ट्रात आणून त्याची वाहतूक केली जात असल्याची बाब या प्रकरणात समोर आली आहे. संबंधित ठिकाणी कारवाईदरम्यान गोवा बनावटीच्या विविध ब्रँडच्या मद्याच्या बाटल्या आणि त्यांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची टोयोटा इनोव्हा कार पोलिसांनी जप्त केली.

विविध ब्रँडच्या मद्याच्या बाटल्या जप्त

या कारवाईत रिझर्व्ह-७ कंपनीच्या ७५० मिलीच्या १४४ बाटल्या, गोल्डन ऐस ब्लू कंपनीच्या फाइन व्हिस्कीच्या ७५० मिलीच्या ८४ बाटल्या आणि १८० मिलीच्या २४० बाटल्या जप्त करण्यात आल्या. याशिवाय डीएसपी ब्लॅक डिलक्स कंपनीच्या ७५० मिलीच्या ४८ बाटल्या, रॉयल स्टॅग कंपनीच्या ७५० मिलीच्या २४ बाटल्या, मॅकडोनाल्ड नं. १ ओरिजिनल कंपनीच्या ७५० मिलीच्या १२ बाटल्या आणि मॅन्शन हाऊस कंपनीच्या ७५० मिलीच्या १२ बाटल्यांचा समावेश आहे.

जप्त करण्यात आलेल्या या मद्यसाठ्याची नोंद फिर्यादीमध्ये बाजारभावानुसार एकूण १ लाख ८८ हजार ७६० रुपये अशी करण्यात आली आहे. मद्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेल्या पांढऱ्या रंगाच्या टोयोटा इनोव्हा कारची किंमत १० लाख रुपये नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे मद्यसाठा आणि वाहनासह जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ११ लाख ८८ हजार ७६० रुपये होते.

याप्रकरणी चेतन राजेंद्र चंदगडकर (रा. अडकूर), दिलीप मेघकर (रा पार्ले), गुरुनाथ पिलारे (रा. सातवणे), अनिल गावडे (रा. दाटे), राजू नाईक (रा. कानूर बुद्रुक), उमेश आडवण (रा. तुडये), सर्व ता. चंदगड, आणि दत्तात्रय दळवी (रा. इचलकरंजी) अशा सात जणांविरुद्ध चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र दारूबंदी कायदा व मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक एस. एम. शेख पुढील तपास करीत आहेत.


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!