जि. पं. वर समितीच्या वर्चस्वाचा इतिहास
आरक्षणाच्या चक्रीय पद्धतीचा फज्जा: SC, ST समाजाला संधीच नाही!
खानापूर: राजू कुंभार
खानापूर तालुक्यात जिल्हा पंचायत (Z.P.) विभाग निर्माण झाल्यापासून मागील निवडणुकीपर्यंत जिल्हा पंचायतीवर महाराष्ट्र एकीकरण समितीचेच वर्चस्व राहिले आहे. मराठी भाषिक जनतेने प्रत्येक निवडणुकीत आपले राजकीय अस्तित्व सिद्ध करण्याची संधी कधीही सोडलेली नाही. येत्या जिल्हा पंचायत निवडणुकीतही जनतेच्या पसंतीचा योग्य उमेदवार दिल्यास किमान तीन मतदारसंघांत पुन्हा समितीचे उमेदवार बाजी मारतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.
मात्र, दुसरीकडे प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे आरक्षणाच्या ‘रोस्टर सिस्टीम’चा पार बोजवारा उडाला असल्याचे समोर आले आहे. तालुक्यातील नंदगड, लोंढा, जांबोटी आणि गर्लगुंजी या चार प्रमुख जिल्हा पंचायत मतदारसंघांच्या १९८९ पासूनच्या आरक्षणाचा आढावा घेतला असता, प्रशासनाकडून ‘कर्नाटक ग्राम स्वराज्य आणि पंचायत राज कायदा, १९९३’ च्या कलम १६२ सह चक्रीय आरक्षण नियमांचे उघड उघड उल्लंघन झाल्याचा गंभीर आरोप स्थानिकांमधून केला जात आहे.
वर्षानुवर्षे ठराविक प्रवर्गांचेच आरक्षण लादल्यामुळे अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील उमेदवारांना आजपर्यंत या चारही मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवण्याची साधी संधीही मिळालेली नाही.
चारही मतदारसंघांचा ऐतिहासिक आढावा अन् २०२६ चे आरक्षण, तसेच विजयी उमेदवार.
१. लोंढा जिल्हा पंचायत:
१९८९: सामान्य (बंडोपंत कपीलेश्वरी – समिती)
१९९५: सामान्य (पांडू देसाई – समिती)
२०००: सामान्य महिला (पद्मजा देसाई – समिती)
२००५: ‘अ’ वर्ग पुरुष (मुगुटसाब धारवाडी – समिती)
२०१०: सामान्य (पी. वाय. देसाई – भाजप)
२०१६: सामान्य महिला (अंजना बाबुराव देसाई -भाजप)
२०२६: सामान्य महिला
२. नंदगड जिल्हा पंचायत:
१९८९: सामान्य महिला (पाटील – समिती)
१९९५: सामान्य महिला (पाटील झुंजवाड – समिती)
* २०००: सामान्य (जयंत पित्रे – समिती / पुंडलिक कारलगेकर – समिती)
* २००५: सामान्य महिला (पार्वती विठ्ठल पाटील – समिती)
* २०१०: सामान्य (गजानन रेमानी – भाजप)
* २०१६: सामान्य महिला (सुप्रिया कुटरे – समिती)
* २०२६: ‘अ’ वर्ग महिला
* ३. गर्लगुंजी जिल्हा पंचायत:
* १९९५: सामान्य (दिगंबर पाटील – समिती)
* २०००: ‘अ’ वर्ग महिला (वंदना पाटील – समिती)
* २००५: ‘ब’ वर्ग पुरुष (विशाल पाटील – समिती)
* २०१०: सामान्य महिला (लक्ष्मी गोपाळ पाटील – समिती)
* २०१६: ‘अ’ वर्ग पुरुष (लक्ष्मण कार्वेकर – समिती)
* २०२६: सामान्य महिला
* ४. जांबोटी जिल्हा पंचायत:
* १९९५: ‘अ’ वर्ग पुरुष (बडकू पाटील – समिती)
* २०००: सामान्य महिला (विद्या डीचोलकर – समिती)
* २००५: सामान्य (बाबुराव देसाई – भाजप)
* २०१०: ‘अ’ वर्ग पुरुष (लक्ष्मण बामणे – समिती)
* २०१६: सामान्य (जयराम देसाई – समिती)
* २०२६: सामान्य
प्रशासकीय निष्काळजीपणाचा फटका: न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालयात जाणार
लोकशाहीत प्रत्येक घटकाला आणि समाजाला समान प्रतिनिधित्वाचा हक्क मिळणे हा त्यांचा घटनात्मक अधिकार आहे. मात्र, प्रशासनाच्या उदासीन आणि मनमानी कारभारामुळे चक्रीय आरक्षण पद्धतीची (Roster System) योग्य अंमलबजावणी न झाल्याने SC आणि ST समाजावर गेल्या तीन दशकांपासून घोर अन्याय होत आहे. २०२६ च्या आरक्षण यादीतही प्रशासनाने त्याच चुकीच्या धोरणाची पुनरावृत्ती करून कायद्याची पायमल्ली केली आहे.
या बेकायदेशीर आरक्षणाविरोधात स्थानिक जागरूक नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली असून, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागितली जात आहे. जर प्रशासनाने वेळेत चूक सुधारून योग्य न्याय दिला नाही, तर या अन्यायाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाईल,असा स्पष्ट इशारा स्थानिकांनी दिला आहे.
(टीप- माहिती स्रोत माजी ता.पं सदस्य बाळासाहेब शेलार तसेच माजी जि. पं सदस्य पुंडलिक कारलगेकर. यात मागील निवडणुकातील तपशिलात दुरुस्ती असू शकते )
Advertise



