प्रेयसीचे लग्न ठरल्याच्या रागातून प्रियकराने नाईकवाडीतील कड्यावरुन प्रेयसीला ढकलले ; प्रियकर पोलिसांच्या ताब्यात


साडेचार वर्षांच्या प्रेमसंबंधाचा दुर्दैवी शेवट; तरुणीच्या मृत्यूने खळबळ

गारगोटी प्रतिनिधी : श्री स्वप्निल कुंभार.

भुदरगड तालुक्यातील नाईकवाडी येथे प्रेमसंबंधातून २३ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीला कड्यावरून ढकलून दिल्याचा आरोप तिच्या प्रियकरावर करण्यात आला असून, या प्रकरणी श्रीपाद दिनकर वडर (वय २५, रा. गारगोटी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे भुदरगड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मृत तरुणीचे नाव तरन्नुम बशीर नाईक (वय २३, मूळ रा. पाटगाव, सध्या रा. गारगोटी) असे आहे. तरन्नुम आणि श्रीपाद यांच्यात गेल्या साडेचार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही एकमेकांच्या घरासमोर राहत असल्याने त्यांची ओळख झाली होती. तरन्नुम ही अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. दरम्यान, चार महिन्यांपूर्वी तिचा विवाह ठरला होता.

घटनाक्रम:

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी श्रीपाद याने तरन्नुमला नाईकवाडी येथील कड्यावर फिरण्यासाठी नेल्याचे सांगितले जाते. तेथे दोघांमध्ये विवाह आणि प्रेमसंबंध सुरू ठेवण्यावरून वाद झाल्याचा आरोप आहे. विवाह ठरल्यामुळे यापुढे प्रेमसंबंध सुरू ठेवणे शक्य नसल्याचे तरन्नुमने सांगितल्याने श्रीपादने तिला कड्यावरून खाली ढकलल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत तरुणीचा मृत्यू झाला.

घटनेनंतर श्रीपाद स्वतःहून भुदरगड पोलीस ठाण्यात हजर झाला. सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, चौकशीदरम्यान प्रकरणातील संशयास्पद बाबी समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. या प्रकरणी भुदरगड पोलिसांनी श्रीपादला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.

प्रेमसंबंधातून घडलेल्या या कथित घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, प्रकरणातील नेमके सत्य पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे.


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!