समितीची धडपड, भाजपची रस्सीखेच, काँग्रेसची गळती
तालुका पंचायत मध्ये कोण बाजी मारणार
खानापुरात राजकीय चिखलफेक सुरु!
राजू कुंभार / खानापूर
तालुका आणि जिल्हा पंचायतीच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी खानापूर तालुक्यातील राजकीय हवा गरम न होता अक्षरशः तापू लागली आहे. मागील2016च्यानिवडणुकीत २४ पैकी ११ जागा जिंकून महाराष्ट्र एकीकरण समितीने सत्ता मिळवली खरी, पण आजची परिस्थिती पाहता, “सत्ता टिकवणे” हे समितीसाठी गड जिंकण्यापेक्षा कठीण झाले आहे. दुसरीकडे भाजपमध्ये इच्छुकांची अशी काही झुंबड उडाली आहे की, ‘तिकीट कुणाला आणि डच्चू कुणाला’ यावरून पक्षातच यादवी माजण्याची चिन्हे आहेत. तर काँग्रेसची अवस्था ‘झाकली मूठ’ अशी असून नव्या फळीअभावी पक्षाची गाडी धडपडत चालली आहे.
भाजपमध्ये ‘तीन तेरा’ वाजणार? तीन नेत्यांच्या महत्त्वाकांक्षेची कुऱ्हाड पक्षाच्याच मुळावर!
भाजपकडे आजच्या घडीला पारडे जड दिसत असले, तरी पक्षांतर्गत सुरू असलेली सुप्त बंडाळी पक्षाचा घात करण्याची दाट शक्यता आहे. आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील आणि प्रमोद कोचेरी या तीन ‘अदृश्य’ गटांनी आपापली दुकाने उघडली आहेत. आगामी विधानसभेच्या उमेदवारीची चुरस आतापासूनच सुरू झाल्यामुळे, आपापल्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळवून देण्यासाठी हे तिघेही ताकदीने जोर लावत आहेत.
शांत, संयमी आणि शिक्षकी पेशातून आलेले आमदार हलगेकर कूटनीती, कटकारस्थान आणि राजकीय डावपेचांमध्ये वाकबगार असलेल्या इतर नेत्यांसमोर कितपत तग धरतील, हा मोठा प्रश्न आहे. अध्यक्ष बसवराज सानिकोप यांच्यासमोर तिकीट वाटपाचा डोंगर उभा आहे. जर या बंडखोरीला योग्य वेळी लगाम घातला नाही, तर या निवडणुकीतच भाजपचे ‘तीन तेरा’ वाजणार, हे उघड गुपित आहे.
समितीची अवस्था हलाखीची : सत्ता भोगली आणि चळवळीला वाऱ्यावर सोडले!
ए एकेकाळी एकहाती सत्ता गाजवणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीची अवस्था आज दयनीय झाली आहे. समितीच्या नावावर ज्यांनी वर्षानुवर्षे सत्ता, पदे आणि प्रतिष्ठा भोगली, त्यांनीच आज चळवळीशी फारकत घेतली आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी आणि राष्ट्रीय पक्षांच्या दावणीला बांधले जाऊन काही नेत्यांनी चळवळ आतून पोखरून काढली आहे.
गोपाळ देसाई, माजी आमदार दिगंबर पाटील आणि काही मोजक्या निष्ठावंत ज्येष्ठांनी चळवळीची पालखी अजूनही खांद्यावर पेलून धरली आहे खरी; पण सामान्य कार्यकर्त्यांचा तुटलेला संपर्क आणि स्वार्थी नेत्यांची गद्दारी यांमुळे सत्ता राखताना समितीची पुरती दमछाक होणार आहे.
काँग्रेसला संधी, कार्यकर्त्यांची फिरस्ती सुरू
काँग्रेससाठी या निवडणुकीत मोठी संधी उपलब्ध आहे; परंतु पक्षाची अवस्था ‘धनी ना कोणी’ अशी झाली आहे. माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्यावर गोव्याची जबाबदारी आल्याने त्यांचे तालुक्याकडे दुर्लक्ष झाले आहे. नेत्याच गायब असल्याने जुने कार्यकर्ते बेळगावातील बड्या नेत्यांच्या वळचणीला गेले आहेत.
आजघडीला अनेक पक्ष फिरून आलेल्या ‘आयाराम-गयारामांच्या’ भरवशावर खानापूर काँग्रेसचा डोलारा उभा आहे. जोपर्यंत पक्षात नवी, आक्रमक फळी निर्माण होत नाही आणि पक्षांतर्गत सुधारणा होत नाहीत, तोपर्यंत मिळालेल्या संधीचे सोने करणे काँग्रेसला अशक्यच दिसते.
थोडक्यात काय तर…
गर्लगुंजी, लोंढा, पारिश्वाड, कक्केरी, नंदगड आणि जांबोटी या 6जिल्हा पंचायत मतदारसंघांसह 20 तालुका पंचायत जागांवर सत्ता मिळवण्यासाठी प्रत्येक पक्ष ताकद लावत आहे. पण, भाजपची अंतर्गत गटबाजी, समितीचे पोखरलेले अस्तित्व आणि काँग्रेसचा नेतृत्वाचा दुष्काळ पाहता, जनता कुणाच्या गळ्यात विजयाची माळ घालणार की सर्वांनाच घरचा रस्ता दाखवणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे!
तालुका पंचायत 2016 (24 मतदार संघ)
१कणकुंबी-पुष्पा नाईक (समिती)
२जांबोटी-पुंडलिक पाटील (समिती)
३नेरसा-भगवती सुतार (समिती)
४निट्टूर-श्वेता प्रकाश माजगावी (समिती)
५ हलकर्णी-कविता कुंभार
६गलगुंजी-पांडुरंग सावंत (समिती)
७रामगुरवाडी- बाळासाहेब शेलार(समिती)
8)देवलत्ती-वासुदेव नांदूरकर (भाजप)
९)पारिश्वाड- तगेव्वा काद्रोळी (भाजप)
९हिरेमुन्नोळी-श्रीकांत इटगी B(भाजप)
१०इटगी-बसवराज सानिकोप(भाजप)
११गंदिगवाड कामतगि (भाजप)
१२बीडी -गंगुबाई विठ्ठल शिंदोळकर (समिती)
१३केरवाड mangynkop -शिवू चलवाळी (भाजप)
१४कक्केरी-
१५हलशी-संजय हालगेकर (समिती)
१६नंदगड-अमिलाबी तशीलदार (काँग्रेस)
१७हेब्बाळ-नंदा कोडचवड कर(समिती)
१८गुंजी-सौ शीतल.विठ्ठल कौंदलकर (समिती)
१९लोंढाप्रवर्ग – दुलबा मिराशी (समिती)
२०गोदोळी-इम्रान तालीकोटी (काँग्रेस)
21चापगाव -भरती बांबर्डी,(भाजप)
22बेकवड -रुक्मिणी पाटील,(भाजप)
24 माग्यानकोप -चलवादी
(टीप- यामध्ये काही नावे उपलब्ध झाली नाहीत तर काही जणांनी अपक्ष निवडून सत्तेसाठी समिती किंवा भाजपला साथ दिली होती त्यामुळे बातमीत सुधारणा होऊ शकते. बराच काळ झाल्याने नजर चुकीने नावात बदल झाल्यास क्षमस्व)
Advertise



