वारणा दूध प्रक्रिया केंद्रासमोर कारवरील ताबा सुटल्याने ३ पलटी; सुदैवाने जीवितहानी टळली.
औरनाळ (प्रतिनिधी): श्री. स्वप्निल कुंभार.
आज, शनिवारी (२६ सप्टेंबर) सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास औरनाळ फाटा येथे एक भीषण अपघात घडला. ह्युंडाई आय१० (MH12 FU 5387) ही गाडी गडहिंग्लज दिशेने शेंद्रीकडे जात असताना वारणा दूध प्रक्रिया केंद्रासमोर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे कार रस्त्यावर २ ते ३ वेळा पलटी खाऊन लगतच असलेल्या कांबळे यांच्या चहाच्या टपरीमागे जाऊन कोसळली.

या अपघातात शेंद्री येथील सिद्धेश्वर मठाचे स्वामीजी गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन स्वामीजींना गाडीतून बाहेर काढले. त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ गडहिंग्लज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कार २ ते ३ वेळा पलटी झाल्यामुळे पूर्णपणे दबली गेली असून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, इतका भीषण अपघात होऊनही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिली.

