अवैध दारू निर्मितीवर चंदगड पोलिसांची कारवाई
चंदगड : स्वप्नील कुंभार
चंदगड सद्या गांजा, ड्रग आणि तत्सम अमली पदार्थांच्या गुन्ह्यानी चर्चेत आहे. गुन्हेगारीचे प्रमाण अलीकडे वाढले असून चंदगड पोलीसांनी जोरदार कारवाया हाती घेतल्या आहेत. महिनाभरात अबकारी खात्याच्या मदतीने चार गावठी दारू गुत्यांवर कारवाई करून रसायन आणि मुद्देमाल ताब्यात घेण्यासह आरोपींवर कठोर कारवाई केली आहे.नुकताच चंदगड पोलिसांनी रामपूर हद्दीत अवैध गावठी दारू तयार करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कारवाई केली. या प्रकरणी दत्तात्रय बाळू नाईक (वय ६०, व्यवसाय शेती, रा. रामपूर, ता. चंदगड) यांच्याविरुद्ध चंदगड पोलीस ठाण्यात दारूबंदी कायदा कलम ६५(ग)(च) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता रामपूर हद्दीतील गट नं. २८८ येथे ही कारवाई करण्यात आली. आरोपीकडे विना परवाना गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन व साहित्य आढळून आले.कारवाईदरम्यान पोलिसांनी २० हजार रुपये किमतीचे दोन गोलाकार प्लास्टिक बॅरल, त्यामध्ये प्रत्येकी १०० लिटरप्रमाणे एकूण २०० लिटर तयार रसायन, तसेच ३ हजार रुपये किमतीचे दोन प्लास्टिक बॅरल व एक लोखंडी बॅरल असा एकूण २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी फिर्यादी संग्राम जिवबा पाटील, पोलीस हवालदार, चंदगड पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली. पोलीस हेड कॉन्स्टेबल राजगिरे यांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पो. अं. पुनाळकर करीत आहेत.


